१०० पेक्षा अधिक दुकानदारांकडून समोरील मार्जिनल स्पेसवर शेड टाकून बेकायदेशीरपणे साहित्य विक्री

 एपीएमसी मधील मार्जिनल स्पेसमध्ये बेकायदेशीर व्यवसाय

तुर्भे ः तुर्भे एपीएमसी परिसरातील वाणिज्य संकुलांमधील दुकानदारांनी दुकानासमोरील मार्जिनल स्पेस हडप करुन त्यामध्ये बेकायदेशीरपणे व्यवसाय थाटला होता. याचा पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याची नोंद घेत नवी मुंबई महापालिका तुर्भे विभाग कार्यालयातील अतिक्रमण विरोधी पथकाने या प्रकरणी कारवाई केली.

एपीएमसी भाजी मार्केट समोरील माथाडी भवन, निर्यात भवन लगत ग्रोहीतम इमारत, ग्रोमा हाऊस, मर्चंट चेंबर तसेच जलाराम मार्केट आदी  वाणिज्य संकुले आहेत. या वाणिज्य संकुल मधील तळ मजल्यावरील १५० पेक्षा अधिक दुकानदारांनी नियमानुसार त्यांना मिळालेल्या दुकानामध्ये व्यवसाय करणे बंधनकारक असतानाही १०० पेक्षा अधिक दुकानदारांनी त्यांच्या दुकानासमोरील मार्जिनल स्पेसवर शेड टाकून बेकायदेशीरपणे साहित्य विक्रीसाठी ठेवले होते. तसेच महापालिकेच्या पदपथांवरही या दुकानदारांनी त्यांचे साहित्य ठेवून नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण केला होता. इतकेच नव्हे माथाडी भवन ते मर्चंट चेंबर इमारतीपर्यंत फेरीवाल्यांनी चक्क पदपथ आणि रस्ता यांवर बस्तान मांडले होते. अखेर महापालिकेने कारवाई करुन मार्जिनल स्पेसवरील २० दुकानांचे शेड काढले. तर काही दुकानदारांनी महापालिकेच्या कारवाईच्या भीतीने अगोदरच शेड काढून घेतली होती.

मार्जिनल स्पेसमध्ये साहित्य विक्रीसाठी ठेवल्याबद्दल कारवाई करून १ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती महापालिका तुर्भे विभाग अधिकारी सुखदेव येडवे यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भुमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली सर्वच घरे भाडे पट्ट्यावर सशुल्क नियमित करण्याचे आवाहन