विभाग अधिकाऱ्यांनी रात्रीचे दौरे करुन या कामाचे नियमित परीक्षण करण्याचे निर्देश

‘स्वच्छ नवी मुंबई'साठी झोकून काम करण्याचे निर्देश

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेने शहर स्वच्छतेमध्ये एक स्तर गाठला असून आता त्यामध्ये अधिक सुधारणा करत आणखी उच्चस्तर गाठण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करायला हवेत. अतिशय जागरुकतेने इतर शहरांमध्ये सुरु असलेल्या स्वच्छता कामांचा अंदाज घ्ोत आणखी उत्तम दर्जाची स्वच्छता राखायलाच हवी, असे स्पष्ट निर्देश महापालिका प्रभारी आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वच्छता विषयक आढावा बैठकीप्रसंगी दिले.

दरम्यान, राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबईची स्वच्छता स्थिती चांगली असली तरी आता प्रत्येक शहरात जागरुकता आली आहे याची जाणीव ठेवून स्वच्छता नियमित करण्याची गोष्ट आहे याचे भान राखावे आणि आपली गुणवत्ता अधिक उंचाविण्यासाठी दुर्लक्ष करु नये. स्वच्छता कामाशी संबंधित प्रत्येकाने आपला अधिकाधिक वेळ  क्षेत्रीय स्तरावर कामातील गुणवत्ता वाढीसाठी दिला पाहिजे. त्यानुसार कामाच्या वेळेचे नियोजन करावे, अशा सूचनाही आयुक्त बांगर यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.  

शहरातील वर्दळीच्या भागांची दोन वेळा स्वच्छता केली जाते. विभाग अधिकाऱ्यांनी रात्रीचे दौरे करुन या कामाचे नियमित परीक्षण करावे. फुट जॉईंटच्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन तेथील स्टॉल धारकांना ओला आणि सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र डबे ठेवणे अनिवार्य करावे. स्वच्छता परीक्षणासाठी विभागवार नेमलेल्या विभागप्रमुख स्तराच्या नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागात दौरे सुरु करुन स्वच्छतेमध्ये सुधारणा होईपर्यंत त्या कामांचा पाठपुरावा करावा, असेही आयुक्त बांगर यांनी निर्देश दिले. शहरातील नागरिकांना आपल्या बांधकाम, पाडकामाच्या डेब्रीजची सुयोग्य विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने सुरु करुन दिलेली ‘डेब्रीज ऑन कॉल' सुविधा अधिक कार्यक्षम करून त्यासाठी उपलब्ध करुन दिलेला ८८९८०१७००९ या मोबाईल नंबर जास्तीत जास्त प्रसारित करावा. यासोबतच महापालिकेचा सी ॲण्ड डी वेस्ट प्रकल्प अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आयुक्त बांगर यांनी सूचित केले.

दरम्यान, घराघरातून कचरा वर्गीकरण आपले प्रमुख लक्ष्य असून त्यादृष्टीने आपली क्षमता वाढवा. तसेच मोठ्या प्रमाणावर कचरा निर्मिती होते अशा सोसायट्या, हॉटेल्स, संस्था याठिकाणी बल्क वेस्ट जनरेटर प्रकल्प राबविण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांची संख्या वाढविण्याची व्यापक स्वरुपात कार्यवाही करावी. कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने ‘झिरो वेस्ट मॉडेल'चा प्रभावी उपक्रम असून त्यामध्ये नवी मुंबई आघाडीवर आहे याचा अभिमान बाळगताना त्याची व्याप्ती वाढवून प्रत्येक झोपडपट्टीत झिरो वेस्ट स्लम मॉडेल राबविण्यासाठी गतीमान कार्यवाही करावी. स्वच्छता नवी मुंबईची ओळख असून आपली बलस्थाने ओळखून ती अधिक सक्षम करण्यासाठी नियोजनबध्द पावले उचलण्याच्या सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी दिल्या.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विभागातील सर्व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी विकास क्षेत्र निहाय कामांचे नियोजन करण्याचे निर्देश