क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त मोठ्या संख्येने महिला स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी

आम्ही सावित्रीच्या लेकी म्हणत महिलांनी साकारले कलासंस्कृतीचे रंग

नवी मुंबई ः पुरोगामी महाराष्ट्रातील महिलांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील अग्रणी समाजसुधारक, भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करीत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या विशेष सोहळ्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत विविध स्पर्धा उपक्रमांतून आपल्या अंगभूत कलागुणांचे दर्शन घडविले. त्यामधील सर्वोत्तम सादरीकरण करणाऱ्या महिलांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे आणि सुजाता ढोले, समाजविकास विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, परवाना विभागाचे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, समाजविकास अधिकारी सर्जेराव परांडे, माजी नगरसेविका शुभांगी पाटील, शशिकला पाटील, आदि उपस्थित होते.

कोपरखैरणे, सेक्टर-८ येथील शिवराज्य प्रतिष्ठान पुरस्कृत शिवाई महिला समुह यांना यावर्षीचा मानाचा ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार'आ. गणेश नाईक आणि आ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे पुरस्काराचे सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र स्विकारुन पुरस्काराची २१ हजार इतकी रक्कम पुरस्कार विजेत्या संस्थेने नवी मुंबई महापालिकेला विद्यार्थी आणि बालकांच्या कल्याणकारी योजनांसाठी परत केली. त्यांच्या या दातृत्वाचे सर्व उपस्थितांनी मुक्तकंठाने कौतुक केले. सावित्रीबाईंच्या जयंती निमित्त आयोजित विविध स्पर्धांमधील गायन स्पर्धेत मंगला भोई, वैजयंता महामुनी आणि नुतन परब यांनी अनुक्रमे तीन क्रमांकाची पारितोषिके पटकाविली. नृत्य स्पर्धेत सानिका झावरे, सोनाली साळवे, साक्षी वडजे यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय तसेच श्रेया पाटील यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक संपादन केले. निबंध स्पर्धेत कंचन वर्मा, अंजली हजारे, दर्शना भोईर यांनी तसेच पाककला स्पर्धेत सुनिता काटकर, अस्मिता जाधव आणि ऋचीका भोईर यांनी अनुक्रमे तीन क्रमांकाची पारितोषिके संपादन केली. सलाड सजावट स्पर्धेत सारिका भोईर, उषा रेणके आणि प्राजक्ता रानकर यांनी त्यांचप्रमाणे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करण्याच्या स्पर्धेत मिरा मंडलीक, नेहल घरत आणि हर्षाली रानकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक संपादन केला.

अशाच प्रकारे विभागनिहाय घेतलेल्या रांगोळी आणि मेहंदी स्पर्धेतील प्रथम ३ क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येक विभागासाठी ३ पारितोषिके प्रदान करण्यात आली. पारितोषिक विजेत्यांना ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपये रक्कमेची पारितोषिके सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रासह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

दरम्यान, आम्ही सावित्रीच्या लेकी म्हणत मोठ्या संख्येने महिला या सर्व कलागुणदर्शनपर स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. त्यांचे सादरीकरण पाहण्यासाठी नवी मुंबईकर महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विभाग अधिकाऱ्यांनी रात्रीचे दौरे करुन या कामाचे नियमित परीक्षण करण्याचे निर्देश