‘पोलीस भरती'मध्ये पारदर्शकता अन् चोख व्यवस्था
नवी मुंबई पोलिसांच्या पोलीस भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकपणा
नवी मुंबई ः पोलीस भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी चोख व्यवस्था करण्याबरोबच पोलीस भरतीत सहभागी झालेल्या उमेदवारांची राहण्याची, टॉयलेट आणि बाथरुमची व्यवस्था केली आहे. त्यामुळे अत्यंत शांततेत आणि सुरळीत पोलीस भरती प्रक्रिया पार पाडली जात आहे. नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या सोयी-सुविधांमुळे पोलीस भरतीत सहभागी झालेल्या उमेदवारांमधून देखील समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस होण्याची इच्छा बाळगणारे राज्यभरातील लाखो तरुण-तरुणी वर्षानुवर्षे तयारी करत असतात. २ जानेवारी पासून सुरु झालेल्या पोलीस भरतीमध्ये राज्यभरातील १८ लाखांपेक्षा अधिक तरुण-तरुणींनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील २०४ पोलीस शिपाई पदासाठी तब्बल १२,३७५ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. यामध्ये १०,४३४ पुरुष तसेच १७९४ महिला तर १४७ माजी सैनिकांचा समावेश आहे.
पोलीस भरतीत बहुतेक तरुणांचा ओढा मुंबईकडे असतो. त्यामुळे पोलीस भरती निघाल्यानंतर हजारो तरुण मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात धाव घेतात. विविध जिल्ह्यातून पोलीस भरतीसाठी येणारे काही तरुण मुंबईत आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे आसरा घेतात. मात्र, यातील बहुतेक तरुणांचे मुंबईत कुणीही नातेवाईक नसल्याने सदर तरुण रस्त्याच्या बाजुला, ब्रीज खाली आसरा घेऊन, आंघोळ पाण्याशिवाय राहतात. तसेच त्याचठिकाणी आपल्या सर्व विधी उरवूÀन पोलीस भरतीत मैदानी चाचणीत सहभागी होत असल्याचे चित्र मागील पोलीस भरतीवेळी अनेकांच्या निदर्शनास आले होते.
सदर बाब लक्षात घेऊन नवी मुंबई पोलिसांनी पोलीस भरतीसाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून आलेल्या तरुणांची कुठल्याही प्रकारची गैरेसोय होऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयच्या वतीने पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी प्रथमच राहण्याची, टॉयलेट, बाथरुमची सोय केली आहे. त्यासाठी कळंबोली येथील पोलीस मुख्यालयालगत असलेल्या सिडको ग्राऊंडवर मंडप टाकण्यात आला असून २ जानेवारी रोजी रात्री सदर ठिकाणी पोलीस भरतीसाठी आलेल्या सुमारे २०० उमेदवारांनी आसरा घेतला. इतकेच नव्हे तर मैदानी चाचणीत सहभागी झालेल्या या तरुणांना सकाळी वडापाव आणि केळी सुध्दा पोलीस आयुक्तालय कडून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलीस शिपाई भरती प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने व्हावी यासाठी मैदानी चाचणीच्या वेळी नवी मुंबई पोलिसांकडून आर.एफ.आय.डी. तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. प्रत्येक उमेदवाराला रेडिओ फ्रिक्वेन्सी ओळख देण्यात आले आहे. त्याशिवाय प्रत्येक उमेदवारांच्या हाताच्या बोटांचे ठसे घेण्यात येऊन त्यांचा चेहरा स्कॅनिंग करण्यात येत असल्याने पोलीस भरतीत डमी उमेदवार सहभागी होण्याचा प्रकारच पूणपणे बंद करण्यात आला आहे. मैदानी चाचणी अधिक पारदर्शक पध्दतीने व्हावी यासाठी पोलीस मुख्यालयातील मैदानावर प्रत्येक टप्प्यावर ६० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याशिवाय २० हॅन्डीकॅम द्वारे मैदानी चाचणीची व्हिडीओग्राफी करण्यात येत आहे. मैदानी चाचणीत प्रत्येक टप्प्यावर उमेदवारांचे शुटींग करण्यात येत असल्याने तसेच त्यांच्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असल्यामुळे मैदानी चाचणी अंत्यत पारदर्शक पध्दतीने होत आहे.
या मैदानी चाचणीसाठी सुमारे ३०० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून उमदेवारांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी प्रत्येक टप्प्यावर तैनात असलेल्या पोलिसांकडे वॉकीटॉकीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय मैदानी चाचणीत एखाद्या उमेदवाराला काही दुखापत झाल्यास, त्याला अत्यवस्थ वाटू लागल्यास त्यांच्यासाठी खास कार्डीयाक ॲम्ब्युलन्सची तसेच डॉक्टरांच्या टीमची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मैदानी चाचणीत सहभागी झालेल्या उमेदवारांकडून देखील समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मैदानी चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांचे बॅग आणि इतर वस्तू सुरक्षित रहावेत यासाठी देखील पोलीस आयुक्तालय कडून स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारांनी पोलीस मुख्यालयाच्या मैदानात प्रवेश केल्यानंतर त्या उमेदवारांच्या बॅगला टॅग लावण्यात येऊन ती बॅग सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांना आपली बॅग हरविण्याची भिती राहणार नाही. तसेच त्यांना निश्चिंतपणे आपली मैदानी चाचणी पूर्ण करता येणार आहे. मैदानी चाचणी पूर्ण झाल्यानंतर टॅग दाखवून आपली बॅग परत घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलीस भरतीसाठी येणारे उमेदवार झेरॉक्स, प्रिंटआऊट काढण्यासाठी बाहेर भटकु नयेत यासाठी त्यांना पोलीस मुख्यालयातच अत्यंत वाजवी दरात झेरॉक्स, प्रिन्ट आऊट काढण्याची व्यवस्था करुन देण्यात आली आहे. त्यासाठी वायफायची सुविधा नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे मैदानी चाचणीसाठी उमेदवार कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात गेल्यानंतर त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस भरतीत सहभागी झालेल्या उमेदवारांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस भरतीसाठी येणारे तरुण राज्यातील विविध जिल्ह्यातुन आले असून त्यांच्यासोबत उध्दटपणे वर्तन न करता त्यांच्यासोबत सौजन्याने वागण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई पोलिसांनी पहिल्या दिवशी ७०० उमेदवारांना कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात मैदानी चाचणीसाठी बोलावले होते. मात्र, त्यापैकी फक्त ३६९ उमेदवार हजर झाले. त्यापैकी ५३ उमेदवार उंची, छाती आणि कागदपत्र पडताळणीत बाद झाले. त्यानंतर उर्वरित ३१६ उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी १२०० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले होते, त्यापैकी ८३१ उमेदवार हजर झाले. त्यापैकी ४३ उमेदवार बाद झाल्यानंतर उर्वरिॅत ७८९ उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली.
सध्या पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी अत्यंत पारदर्शक पध्दतीने घेण्यात येत आहे. येत्या १२ आणि १३ जानेवारी रोजी महिला उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. परराज्यातून पोलीस भरतीत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या महिला उमेदवारांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, अशी त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. -संजयकुमार पाटील, पोलीस उपायुक्त (मुख्यालय), नवी मुंबई.