संपकाळात अखंडीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज
८६००० वीज कर्मचाऱ्यांचा ७२ तासांचा संपाचा इशारा
नवी मुंबई ः महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडलातील कार्यक्षेत्रामध्ये अदानी इलेक्ट्रीकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवान्याच्या विरोधात राज्याच्या वीज कामगार संघटनांनी ३ जानेवारी रोजी मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या पुकारलेल्या संपकाळात राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी ‘महावितरण'ने संपूर्ण तयारी केली आहे.
वीजपुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडल आणि मंडल कार्यालयाच्या ठिकाणी संनियंत्रण कक्ष सुरु करण्यात आली असून सदर नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. कंपनीने ठरवून दिलेली कामे न करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्वरीत कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. संपकाळात वीजपुरवठा अखंडीत आणि नियमित ठेवण्याकरिता ‘महावितरण'ने नियुक्त केलेल्या एजन्सीचे कामगार, कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त झालेले अभियंता आणि कर्मचारी यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक तसेच महाऊर्जा या विभागातील अभियंत्यांना या संपकाळात विविध उपकेंद्राच्या ठिकाणी नेमण्यात येणार आहे. ‘महावितरण'तर्फे नियुक्त करण्यात आलेल्या ज्या एजन्सी या संपकाळात काम करणार नाहीत अशा एजन्सींना तात्काळ बडतर्फ करण्याचे निर्देश देण्यात आले असून वीजपुरवठा सुरळित ठेवण्यासाठी ज्याठिकाणी साहित्याची आवश्यकता भासणार आहे अशा ठिकाणी साहित्याची तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देशही सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या अभियंता, तंत्रज्ञ, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी यांनी ४ जानेवारीच्या शून्य तासांपासून ६ जानेवारीपर्यत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ग्राहकांना अखंडीत वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरण संपूर्ण काळजी घ्ोत असून याउपरही वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्र. १८००-२१२-३४३५/१८००-२३३-३४३५/१९१२/ १९१२० यावर संपर्क साधावा. याशिवाय ठाणे मंडळातील ग्राहक मोबाईल क्र.९९३०२६९३९८ सुध्दा संपर्क करु शकतात. तसेच वाशी मंडळातील ग्राहक मोबाईल क्र.९९२०४९१३८६ (नियंत्रण कक्ष) आणि मोबाईल क्र.८८७९९३५५०१/९९३००२५१०४ सीसीएफसी आणि डीएसएस या क्रमांकावर संपर्क करु शकतात.
संपात सहभागी असलेल्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपला प्रस्तावित संप मागे घ्यावा, असे आवाहन शासनातर्फे करण्यात येत आहे.
नवी मुंबई, पनवेल, उरण, ठाणे, मुलुंड, भांडूप, तळोजा क्षेत्रातील तब्बल ५ लाख वीज ग्राहकांचे क्षेत्र महावितरण कंपनी ऐवजी अदानी इलेवट्रीकल्स कंपनीला हस्तांतरीत होण्याकरिता ‘महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग'कडे करुन वीज पुरवठा करण्याबाबत मागण्यात आलेल्या परवान्याला या मंडळातील कर्मचारी, अधिकारी, अभियंत्यांसह कंत्राटी कामगारांनी विरोध दर्शविलेला आहे. पूर्णतः औद्योगिक विकास झालेल्या या भविष्यातील फायदेशीर विभागात वीज पुरवठा करण्याच्या अदानी इलेवट्रीकल्सला विरोध दर्शविण्यासाठी ‘महावितरण'मधील हजारो अभियंते, कर्मचारी यांनी विविध मार्गाने आंदोलन सुरु केले आहे. परंतु, शासनाकडून त्याची कोणतीच दखल घ्ोण्यात आली नाही. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून इशारा देत ३ जानेवारी रोजी मध्यरात्री पासून ७२ तासांचा संप करण्याचा शासनाला इशारा दिला आहे. एकप्रकारे या खाजगीकरणाविरोधात आता महावितरण मधील ८६ हजार कर्मचारी, अभियंते, अधिकाऱ्यांसह ४२ हजार कंत्राटी कामगारी या संपात उतरणार असल्याचे महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीने दिला आहे.