आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी विशेष नियोजन -विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर

कोकण विभाग मतदारसंघाच्या नवीन मतदार यादीत ३७ हजार ७१९ मतदार

नवी मुंबई ः कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाली असून, कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये एकूण ३७ हजार ७१९ मतदार आहेत. तसेच या निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, याचा भंग होणार नाही याबाबत विशेष नियोजन करण्यात आले असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. कोकण भवनातील समिती सभागृहात ३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भारत निवडणूक आयोगाकडून १ नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत कोकण शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. या घोषित कार्यक्रमानुसार कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी २३ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या यादीनुसार कोकण विभगात एकूण ३० हजार १६२ मतदार असून त्यापैकी १६ हजार ८२ स्त्री मतदार असून १४ हजार ८० पुरुष मतदार होते.  या मतदार याद्यांवर २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्राप्त झालेले दावे-हरकती निर्णीत करुन कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी ३० डिसेंबर रोजी करण्यात आली. या अंतिम यादीनुसार कोकण विभागात एकूण ३७ हजार ७१९ मतदार असून त्यापैकी १८ हजार ९७ स्त्री मतदार आहेत तर १९ हजार ६२२ पुरुष मतदार आहेत.

अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने २९ डिसेंबर २०२२च्या परिपत्रकान्वये कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या जाहीर करण्यात आलेल्या कार्यमक्रमानुसार ५ जानेवारी २०२३ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल. १२ जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक असेल. १३ जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येईल. १६ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घ्ोण्याचा अंतिम दिनांक असेल. ३० जानेवारी रोजी मतदान होईल. मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ अशी असेल. २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी केली जाईल आणि ४ फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. कोकण विभागात जिल्हास्तरावर आचारसंहिता स्थायी समितीची स्थापना करण्यात आली असून,  या समितीत जिल्हाधिकारी आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष, माध्यम प्रमाणीकरण आणि देखरेख समिती तसेच भरारी पथक स्थापन करण्यात येत आहेत.

तालुकास्तरावर व्हिडीओग्राफी पथक तयार करण्यात येत असून, या पथकांमार्फत राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी यांच्या दौऱ्यादरम्यान आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबत पर्यवेक्षण करण्यात येईल, असे आचारसहिंतेबाबत माहिती देताना आयुक्त डॉ. कल्याणकर म्हणाले.
विभागीयस्तरावर चोवीस तास चालू असलेला तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.  प्रसार माध्यमांनी निवडणुकीबाबत जनसामान्यांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन यावेळी नवनियुक्त आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पत्रकार परिषद मध्ये केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

संपकाळात अखंडीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज