तळोजा घोट रस्ता धोकादायक

खारघर ः तळोजा फेज कडून घोटगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पुलावरील काही भाग खचला आहे. सदर ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असून पनवेल महापालिकेने सदर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी रहिवाशांंकडून केली जात आहे.

तळोजा फेज कडून घोटगाव आणि तळोजा एमआयडीसी जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. महापालिकेने वाहतुकीच्या सुरक्षिततेचा विचार करुन खचलेल्या पुलाची दुरुस्ती करून सदर जागी संरक्षणासाठी लोखंडी पाईप लावणे आवश्यक आहे. शिवाय रस्ता अरुंद आहे. महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष केले जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी सदर रस्त्यावर अंधार असतो. त्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यास अपघात होण्याची शक्यता असून महापालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित करून पुलाची दुरुस्ती करावी. तसेच पुलाच्या दोन्ही बाजुला संरक्षण कठडा अथवा लोखंडी पाईप लावण्यात यावे, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. याविषयी महापालिकेचे शहर अभियंता संजय जगताप यांच्याशी संपर्क केला असता होवू शकला नाही.

तळोजा घोट रस्त्यावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. पावसाळ्यात पुलालगतची माती आणि सिमेंट वाहून गेल्यामुळे रस्ता धोकादायक बनला आहे. महापालिकेने तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. -नितेश पाटील, माजी अध्यक्ष-प्रभाग क्रमांक-१, पनवेल महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जेएनपीटी टाऊनशिप येथे युवकांच्या नोकऱ्या संदर्भात एका महत्वाच्या बैठकिचे आयोजन