नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न दृष्टीपथात

नवी मुंबई ः ‘सिडको'च्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. १ वर धावणाऱ्या ‘मेट्रो'ची चाचणी सेंट्रल पार्क ते बेलापूर या स्थानक दरम्यान ३० डिसेंबर रोजी यशस्वीरित्या पार पडली. मेट्रो मार्ग क्र.१ च्या अंमलबजावणीसाठी अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून ‘महा मेट्रो'ची नियुक्ती करण्यात आली आहे.

या प्रसंगी व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, ‘महा मेट्रो'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, ‘सिडको'चे मुख्य अभियंता (नवी मुंबई) डॉ. के. एम. गोडबोले, अधीक्षक अभियंता (नैना, मेट्रो) संतोष ओंभासे, व्यवस्थापकीय संचालकांचे सल्लागार सुनील गुज्जेलवार, कार्यकारी अभियंता (महा मेट्रो) अनुप अग्रवाल, प्रमुख प्रकल्प व्यवस्थापक रितेश गर्ग, आदि उपस्थित होते.

‘सिडको'तर्फे नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने, नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण ४ उन्नत मार्ग विकसित करण्यात येत आहेत. मार्ग क्र.१ बेलापूर ते पेंधर असा ११ कि.मी. लांबीचा आणि ११ स्थानके असणारा मार्ग आहे. या मार्गावरील व्हायडक्टचे काम पूर्ण झाले असून लवकरच सर्व ११ स्थानके प्रवासी
वाहतुकीकरिता सुसज्ज होणार आहेत.

‘सिडको'तर्फे मार्ग क्र.१ वरील उर्वरित कामांची अंमलबजावणी करण्यासाठी ‘महा मेट्रो'ची अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महा मेट्रो भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांचा संयुक्त उपक्रम असून नागपूर आणि पुणे येथील मेट्रो मार्गांची यशस्वीरीत्या अंमलबजावणी ‘महा मेट्रो'तर्फे करण्यात आली आहे. ३० डिसेंबर रोजी सिडको आणि ‘महा मेट्रो'च्या देखरेखीखाली मार्ग क्र.१वरील सेंट्रल पार्क (स्थानक क्र.७) ते बेलापूर (स्थानक क्र.१) या स्थानकांदरम्यान, ५.९६ कि.मी. लांबीच्या टप्प्यात दुपारी अप आणि डाऊन मार्गावर घेण्यात आलेली ‘मेट्रो'ची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली आहे.

यापूर्वी पहिल्या टप्प्यात मार्ग क्र.१ वरील सेंट्रल पार्क ते पेंधर स्थानकांदरम्यान ‘मेट्रो'ची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली असून या मार्गाकरिता सीएमआरएस यांची मंजुरीही मिळाली आहे. आता सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानकांदरम्यानही ‘मेट्रो'ची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली आहे. यामुळे संपूर्ण मार्ग क्र.१ आता लवकरच प्रवासी वाहतुकीकरिता खुला होणार असल्याने नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्नही लवकरच पूर्ण होणार आहे. -डॉ.संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महापालिकेचा ३१ व्या वर्धापन दिन १ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा