‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'च्या अनुषंगाने आयोजित केलेल्या विविध स्वच्छता स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

‘स्वच्छ सर्वेक्षण' अंतर्गत  विविध स्वच्छता स्पर्धा विजेत्यांचा सन्मान

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेने ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'च्या अनुषंगाने आयोजित केलेल्या विविध स्वच्छता स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी सुप्रसिध्द सुलेखनकार अच्युत पालव, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा ‘स्वच्छ भारत मिशन'चे नमुंमपा नोडल आधिकारी डॉ बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, मुख्य स्वचछता अधिकारी राजेंद्र सोनावणे यांच्या शुभहस्ते स्वच्छता स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

चित्रकला स्पर्धेंत सहभागी ९५०० हून अधिक स्पर्धकांतून सागर शशिकांत तांडेल यांनी प्रथम क्रमांक तसेच ईश्वरी दरेकर यांनी द्वितीय आणि रवीतनया चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. भित्तीचित्र स्पर्धेत संग्राम इंगळे यांनी प्रथम, सुप्रीत शेरीगार यांनी द्वितीय आणि सिध्दार्थ लोखंडे यांनी तृतीय क्रमांक संपादन केला. लघुपट स्पर्धेत अक्षय बल्लाळ यांच्या देजा उ या लघुपटाला प्रथम क्रमांकाचा बहूमान मिळाला तसेच संदीप फुलारी यांच्या दुरबीन या लघुपटाने द्वितीय क्रमांकाचे आणि मुक्तछंद नाट्य संस्थेच्या वुई कॅन या लघुपटाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संपादन केले. जिंगल स्पर्धेत कृष्णा-देवा यांनी प्रथम क्रमांकाचे, सुखदा भावे-दाबके यांनी द्वितीय क्रमांकाचे आणि सोमनाथ सोनावणे यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.

पथनाट्य स्पर्धेमध्ये सर्त्कव संस्थेने प्रथम पारितोषिक माध्यमिक विद्यालय सेक्टर-२, ऐरोली यांनी द्वितीय क्रमांकाचे आणि पीव्हीजीएस विद्याभवन शिक्षक संघ नेरुळ यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. याव्यतिरिक्त सर्व स्पर्धांमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिकेही प्रदान करण्यात आली.

स्वच्छ हॉटेल स्पर्धेमध्ये रमाडा हॉटेल यांनी प्रथम क्रमांकाचे, तुंगा हॉटेल वाशी यांनी द्वितीय क्रमांकाचे तर कंट्री हॉटेल महापे यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. स्वच्छ महापालिका शाळा स्पर्धेमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शाळा क्र.५५, आंबेडकर नगर रबाले यांनी प्रथम क्रमांकाचे, शाळा क्र.३६ सेवटर-१९ कोपरखैरणे यांनी द्वितीय आणि शाळा क्र.२८ सेक्टर- १५/१६ वाशी यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. स्वच्छ खाजगी शाळा स्पर्धेमध्ये विबग्योर हायस्कूल-ऐरोली यांनी प्रथम क्रमांकाचे, एपीजे स्कुल-नेरुळ यांनी द्वितीय तर अँकरवाला स्कुल-वाशी यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.

स्वच्छ गृहनिर्माण संस्था स्पर्धेमध्ये सिध्दीविनायक टॉवर सेवटर-५ कोपरखैरणे प्रथम, एनआरआय कॉम्प्लेक्स फेज-१ सीवुडस्‌ यांनी द्वितीय तर भिमाशंकर सोसायटी, सेवटर-१९ ए, नेरुळ यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संपादन केले. स्वच्छ मार्केट स्पर्धेमध्ये श्रमिक जनता फेरीवाला संघटना सेवटर-८ कोपरखैरणे प्रथम, जय भवानी दैनंदिन बाजार सेवटर-५ ऐरोली यांनी द्वितीय तर दैनंदिन बाजार सेवटर-४ सानपाडा मार्केट यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाविले. स्वच्छ शासकीय कार्यालय स्पर्धेमध्ये पोस्ट ऑफिस सेवटर-३ नेरुळ यांनी प्रथम क्रमांकाचे, भारतीय स्टेट बँक सेवटर-११ सीबीडी बेलापूर यांनी द्वितीय आणि एमआयडीसी कार्यालय कोपरखैरणे यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाविले. स्वच्छ हॉस्पिटल स्पर्धेमध्ये एमजीएम हॉस्पिटल वाशी प्रथम, हरिष हॉस्पिटल सेवटर-३ नेरुळ यांनी द्वितीय तर लायन्स हॉस्पिटल सेवटर-७ कोपरखैरणे यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. जग बदलतेय तसेच जगाचे चित्र बदलतेय आणि चित्राची भाषाही बदलते आहे. त्यामुळे बदलत्या जगाचे नवे चित्र नव्या पिढीच्या संकल्पनेतून साकारण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने स्वच्छतेच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत ९५०० हून अधिक इतक्या मोठ्या संख्येने मुले सहभागी झाली याचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी कौतुक केले. स्पर्धेच्या माध्यमातून मुलांनी ‘स्वच्छ नवी मुंबई' विषयीच्या आपल्या मनातील कल्पना चित्रांकित करुन कागदावर मांडल्या, हीच प्रशंसा करण्यासारखी गोष्ट असून नवी मुंबईचा नागरिक असल्याचा तुमच्याइतकाच अभिमान मला आहे. नवी मुंबई महापालिका अशाप्रकारे विविध स्पर्धांच्या आयोजनातून जनतेला स्वच्छता कार्यात सहभागी करुन घ्ोते आणि त्यांच्या कल्पनांना मुक्त वाव देते. सदर बाब नवी मुंबईला सतत आघाडीवर ठेवणारी असल्याचे अच्युत पालव यांनी यावेळी सांगितले.

अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी ‘निश्चय केला-नंबर पहिला' असे उद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'ला सामोरे जात असताना आयुक्तांच्या निर्देशानुसार स्वच्छता उपक्रमांत लोकसहभागावर भर दिला जात असल्याचे सांगत या स्पर्धा त्याच ध्येयपूर्तीचा एक भाग असल्याचे स्पष्ट केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न दृष्टीपथात