‘ज्ञानदीप सेवा मंडळ'च्या महाविद्यालयाचा वर्धापन दिन आणि वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

ग्रामीण विद्यार्थ्यांना आज गुणवत्तापूर्ण शिक्षण -रविंद्र नाईक

नवी मुंबई ः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध नव्हती. अशा कठीण काळात नवी मुंबईच्या एका टोकास असलेल्या करावे गावात ‘ज्ञानदीप सेवा मंडळ'ची ३२ वर्षांपूर्वी  स्थापना करुन शिक्षणाचे रोपटे रुजवले आज त्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. आज स्थानिक, उपेक्षित अशा सर्व घटकातील विद्यार्थी उच्च आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत. आम्ही केलेल्या खडतर प्रयत्नाची फलश्रुती झाली असल्याचे प्रतिपादन ‘ज्ञानदीप सेवा मंडळ'चे अध्यक्ष रविंद्र नाईक यांनी करावे गांव येथे केले .

करावे गांव येथील ‘ज्ञानदीप सेवा मंडळ'च्या प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा वर्धापन दिन सोहळा आणि वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात ३० डिसेंबर रोजी पार पडले. त्यावेळी रवींद्र नाईक बोलत होते. ‘सिडको'ने नागरी वसाहती निर्माण करताना ग्रामीण विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानले नाही. माध्यमिक शिक्षणाची सोय मोठ्या कष्ट आणि मेहनतीने आम्ही उपलब्ध करुन दिले असल्याचे नाईक यांनी सांगितले. यावेळी १७ वर्ष वयोगटामध्ये आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत प्रथम, राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत तिसरा आलेला विकास जाधव तसेच अंधश्रध्दा निर्मुलन, नृत्य आदि शालेय स्पर्धात विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा तसेच आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर ‘ज्ञानदीप सेवा मंडळ'चे अध्यक्ष रविंद्र नाईक यांच्यासह उपाध्यक्ष विजय तांडेल, सचिव अरविंद नाईक, सहसचिव प्रसाद तांडेल, प्राचार्य पी. पी. पाटील, प्राचार्य रत्नाकर तांडेल (इंग्रजी माध्यम), प्राचार्य बंकट तांडेल (प्राथमिक) आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन विद्यार्थ्यांनी उपस्थितीतांची वाहवा मिळवली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

न्हावे खाडी येथे उभारण्यात आलेल्या 'रामबाग' मध्ये नवीन वर्षनिमित्त 'लाईव्ह म्युझिकल इव्हेंट'  या सुरेल गाण्यांची मैफिल