गाव तसं चांगलं; पण वेशीला टांगलं...  

घोट गावातील समस्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष

 खारघर ः तळोजा मधील घोटगाव परिसरात सुरु असलेल्या इमारतींच्या बांधकामामुळे महापालिकेला महसूल पोटी करोडो  रुपये मिळतात. मात्र, गावात महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची विकास कामे केली जात नसल्यामुळे ‘गाव तसं चांगलं; पण वेशीला टांगलं' अशी गावची स्थिती झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने घोट गावातील समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ‘भाजपा'चे ग्रामीण मंडळाचे सरचिटणीस नवनाथ पाटील यांनी केली आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा फेज-२ लगत असलेल्या घोटगावच्या शेजारी टोलेजंग इमारती उभारण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांच्या हिरव्यागार शेतीच्या जागी सिमेंट काँक्रिटीकरणचे जंगल उभे राहत आहे. गावापासून काही अंतरावर मेट्रो रेल्वे असल्यामुळे घरे घेणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहेत. घराच्या बांधकामामुळे महापालिकेला दरवर्षी कोट्यावधी रुपये महसूल पोटी मिळतात. मात्र, घोट गावच्या समस्यांकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे.

गावाची लोकसंख्या आठ हजाराच्या घरात आहे. वाढत्या लोकसंख्यामुळे गावावर ताण पडत आहेत. पिंपळपाडा पासून ते विल्हेज ढाबा दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि होणारा किरकोळ अपघात गावाचा डोकेदुखीचा विषय झाला  आहे. रस्त्याचा  दोन्ही बाजुला असलेली गटारे उघड्या अवस्थेत आहे. त्यामुळे डासअळी आणि मच्छरांमुळे ताप, हिंवतापाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. रस्त्यावरील अनेक पथदिवे बंद आहेत. पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यानंतर गावाचा विकास होईल, असे वाटत होते. मात्र, विकासाऐवजी गाव भकास झाला आहे.  महापालिका प्रशासनाने गावात नागरी सुविधांची काम करुन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एमआयडीसी कडून गावात प्रवेश करताना तळोजा फेज-२ मार्गे रस्ता उपलब्ध करुन गावाचा विकास करावा, अशी मागणी नवनाथ पाटील यांनी केली आहे.

गावालगत कोयना प्रकल्पग्रस्त घोट कॅम्प गावात महापालिकेकडून १३ कोटींची कामे करण्यात आली. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे रस्त्याला भेगा पडल्या आहेत. सदर रस्त्यावरुन मुख्य रस्त्यावर येता येत नाही. असे रस्ते या विभागात तयार करण्यात आले आहेत. तसेच रस्त्यावर, गटारांवर बसविण्यात आलेल्या झाकणालगत भेगा पडल्या असून पाय अडकून अपघात होण्याची भिती नागरिकांनी व्यवत केली आहे. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांनी पाहणी करुन पुढील कामे करावीत, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

श्रीमती संजिवनी पाटील-जाधव यांनी स्विकारला सहायक संचालक पदाचा कार्यभार