देशातील विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून जवळपास १०८ पदकांवर आपले नाव कोरले

ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये १०८ पदकांवर नाव कोरणारा ६७ वर्षीय अवलिया

खारघर ः मनात जिद्द असेल आणि ध्येय प्राप्त करण्याची आंतरिक इच्छा असेल तर तेथे वयही आडवे येत नाही. सानपाडा  येथील ६७ वर्षीय उत्तम माने आजही राज्यस्तरीय स्पर्धा गाजवीत असून आजपर्यंत त्यांनी देशातील विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून जवळपास १०८ पदकांवर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे वयाच्या पंचाहत्तरी पर्यंत २५० पदकांवर नाव कोरण्याचा   त्यांचा मानस आहे.

सानपाडा, सेक्टर-८ मध्ये वास्तव्यास असलेले उत्तम माने सातारा जिल्हा कराड तालुक्यातील गोंदी गावचे रहिवासी आहेत. लहानपणाासूनच कबड्डी, खो-खो,  खेळाची आवड होती. कांदिवली मुंबई येथील शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालयातून बी.एड. शिक्षण पूर्ण झाल्यावर लोकमान्य विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात भूगोल आणि क्रीडा शिक्षक म्हणून नोकरीवर रुजू झाले. नोकरी करीत असतानाही त्यांनी खेळाकडे दुर्लक्ष केले नाही. सन १९९२ ते १९९८ या कालावधीत राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सांगली, भोसरी, इंदापूर आदि ठिकाणी झालेल्या राज्य स्तरावरील स्पर्धेबरोबरच मदुराई चेन्नई (तामिळनाडू), म्हैसूर, मंगलोर (कर्नाटक), कानपूर (उत्तर प्रदेश), कुरुक्षेत्र (हरियाणा), कोझीकोडे, तिरुअनंतपुरम (केरळ), बडोदा (गुजरात), अलवार (राजस्थान), रायपूर (छत्तीसगढ) अशा विविध राज्यातील राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील  प्रौढांच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन भालाफेक, थाळीफेक, हातोडा फेक, लांब उडी या ॲथलेटिक्स स्पर्धा उत्तम माने यांनी गाजविल्या आहे. खेळाबरोबर शिक्षण पूर्ण असावे म्हणून पटीयाळा येथे एनआयएस मध्ये ॲथलेटिक्स, १९९२-९३ साली औरंगाबाद येथे एम.पी.एड आणि २००५ मध्ये डिप्लोमा ईन स्कुल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले.

मिळालेले पुरस्कारः शिक्षक म्हणून शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन आणि विविध स्पर्धेत भाग घ्ोवून पदक प्राप्त केल्यामुळे उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार, शिक्षक रत्न, आदर्श शिक्षक, समाज भूषण महाराष्ट्र पुरस्काराने उत्तम माने यांना सन्मानित करण्यात आले आहे.

नोव्हेंबर महिन्यात नाशिक येथे पार पडलेल्या ज्येष्ठांच्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत लांब उडी क्रीडा प्रकारात ब्राँझ पदक तर १६ ते १८ डिसेंबर दरम्यान मास्टर गेम्स असोसिएशन महाराष्ट्रच्या वतीने  औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे पार पडलेल्या तिसऱ्या महाराष्ट्र स्टेट मास्टर गेम्स-२०२२ या ॲथलेटिक्स स्पर्धेत हॅमर थ्रो, लांब उडी  आणि तिहेरी उडी मध्ये स्पर्धेत उत्तम माने यांनी रौप्यपदक प्राप्त केले आहे. आजपर्यंत ४१ सुवर्ण, ४० रौप्य आणि २७ ब्रॉन्झ अशा एकूण १०८ पदकांवर नाव  कोरले आहे. माने सानपाडा ज्येष्ठ नागरिक विरुंगळा केंद्राचे सदस्य देखील आहेत. महापालिकेने सानपाडा, सेवटर-७येथील सीताराम मास्टर उद्यानात लांब उडीसाठी मैदान उपलब्ध करुन दिल्यास सराव करुन अधिकाधिक स्पर्धेत सहभाग नोंदवून नवी मुंबई महापालिकेचा नाव लौकिक करण्याचा माझा मानस आहे, असे उत्तम माने यांनी सांगितले.

१९९२ ते १९९८ पर्यंत प्रौढांच्या ॲथलेटिक्स खेळाच्या स्पर्धा खेळत असताना  १९९९ ते २०१५ दरम्यान वैयक्तिक कारणांमुळे माने यांना स्पर्धेला मुकावे लागले. २०१३ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर पुन्हा २०१६ पासून स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या सहा वर्षात जवळपास पन्नास हुन अधिक पदकांवर नाव कोरले आहे.  वयाच्या  पंचाहत्तरी पर्यंत  किमान २५० पदके जिंकण्याचा मानस आहे. -उत्तम माने, ज्येष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू, सानपाडा. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सेवानिवृत्त होणाऱ्या २ महापालिका कर्मचाऱ्यांनी राबविला शून्य कचरा उपक्रम