बेलापूर विधानसभा क्षेत्रात भव्य आगरी-कोळी भवन उभारण्याची सौ. मंदाताई म्हात्रे यांची मागणी

 नवी मुंबईमध्ये सुसज्ज आगरी-कोळी भवन उभारण्याची मागणी

नागपूर ः बेलापूर विधानसभा क्षेत्रात सुसज्ज भव्य असे आगरी-कोळी भवन उभारावे, अशी मागणी ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत केलेल्या मागणीच्या अनुषंगाने सिडको आणि नवी मुंबई महापालिका यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे सूचित केले.

नवी मुंबईतील आगरी कोळी समाजातील ग्रामस्थांच्या १०० टक्के जमिनी ‘सिडको'ने संपादित केल्या. नेरुळ येथे ‘सिडको'मार्फत आगरी-कोळी सांस्कृतिक भवन उभारण्यात आले आहे. परंतु, आगरी-कोळी भवन अतिशय छोटे असून समाजातील पारंपरिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे येथे आयोजित होऊ शकत नाहीत. सदर भवनात आगरी-कोळी समाजातील ग्रामस्थांना हॉल उपलब्ध न होता परप्रांतियांना उपलब्ध करुन दिले जाते. या आगरी-कोळी भवनातील लहानसहान कामेही स्थानिक ग्रामस्थांना न मिळता परप्रांतीयांना दिला जातात. ‘भवन आगरी-कोळ्यांचे; परंतु वापर परप्रांतीयांना' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

नवी मुंबईमध्ये वाशी किंवा बेलापूर येथे मध्यवर्ती असे २ एकरच्या भूखंडावर भव्य आणि सुसज्ज असे नवीन आगरी-कोळी भवन स्थानिक ग्रामस्थांकरिता उभारुन दिल्यास स्थानिकांना त्याचा वापर करता येईल. आगरी-कोळी समाजाची संस्कृती जतन व्हावी. केवळ आगरी-कोळी समाजातील नागरिकांना त्याचा लाभ घ्ोता यावा. लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम करण्याकरिता कमी रक्कम आकारुन उपलब्ध करुन दिल्यास स्थानिक ग्रामस्थांना सोयीचे होणार आहे. त्यामुळे लवकरच सदर मागणीबाबत नगरविकास विभाग, सिडको आणि नवी मुंबई महापालिका यांच्यासोबत संयुक्त बैठक आयोजित करुन नवी मुंबईत भव्य आगरी-कोळी भवन उभारण्यात यावे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शाळेची 'फी' भरू शकत नसल्याने कित्येक वर्षे विद्यार्थी घरीच ; शाळा विद्यार्थ्याला दाखला देण्यास मनाई