नागरिकांनी सुरक्षितपणे नववर्ष साजरा करण्याचे पोलिसांचे आवाहन  

थर्टीफस्ट आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस सज्ज  

नवी मुंबई ः नववर्ष साजरा करीत असताना ‘थर्टीफर्स्ट'च्या रात्री शहरात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांकडून शहरातील हॉटेल, बार, ऑर्केस्ट्रा बार, रेस्टॉरंट, परमिट रुम त्याचप्रमाणे खाजगी सोसायट्यांमध्ये, टेरेसवर होणाऱ्या न्यु इयर पाटर्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच मादक पदार्थाचे सेवन करणाऱ्यांवर, विनापरवाना मद्य-फॉरेन लिकर पिणाऱ्यांवर देखील कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत नवी मुंबई पोलिसांकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी २०२३ या नुतन वर्षाचे स्वागत करताना राज्य शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन उत्साहाने आणि सुरक्षितपणे साजरा करावा, असे आवाहन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले आहे.  

मागील दोन वर्षे कोव्हीडचे सावट असल्याने शासनाने थर्टीफर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागत पाटर्यांवर निर्बंध घातले होते. त्यामुळे नागरिकांनी थर्टीफर्स्ट आणि नववर्षाचे स्वागत साधेपणाने केले होते. मात्र, यावर्षी कोव्हीडचे निर्बंध नसल्याने नागरिकांना निर्बंधमुक्त थर्टीफर्स्ट साजरा करता येणार आहे. त्यामुळे यंदा नागरिकांकडून मोठ्या जल्लोषात आणि धुमधडाक्यात थर्टीफर्स्ट आणि नववर्षाचे स्वागत करण्याची तयारी सुरु आहे. नवी मुंबई पोलिसांकडून देखील थर्टीफर्स्ट आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे ३००० पोलीस अधिकारी-कर्मचारी, त्याशिवाय वाहतूक विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच दंगा नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल, होमगार्ड आणि फिरती गस्त पथके तैनात ठेवण्यात आले आहेत.

 त्याचप्रमाणे परिमंडळ स्तरावर आणि वाहतूक विभागाकडून शहराच्या प्रवेशद्वारावर, मुख्य चौकात, नाकाबंदी चेकींगचे पॉईंट लावण्यात येणार आहेत. नवी मुंबईत परिमंडळ स्तरावर ठेवण्यात आलेल्या बंदोबस्तावर पोलीस उपायुक्त तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग स्तरावरुन देखरेख होणार आहेत. याशिवाय गुन्हे शाखेकडून देखील स्वतंत्र बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सागरी किनाऱ्यावर देखील पोलिसांच्या स्पीड बोटी तैनात ठेवण्यात येणार आहेत.  

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पनवेल आणि आजुबाजुच्या परिसरात असलेल्या हॉटेल्स, रिसॉर्ट आणि फार्म हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात पाटर्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी असे दोन दिवस महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक नियमनासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. वाहतूक नियंत्रणासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात ठेवले जाणार आहेत. त्यामुळे पोलिसांची अतिउत्साही पर्यटकांवर, मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर करडी नजर असणार आहे. राज्य शासनाने बार, हॉटेल्स, रेस्टॉरंट, फार्महाऊस यांना ‘थर्टीफर्स्ट'च्या निमित्ताने पहाटेपर्यंत सुरु ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बार, हॉटेल्स आणि इतर आस्थापनेवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.  

नागरिकांनी बेवारस वस्तू, संशयित व्यक्ती, संशयित वाहन, दारु पिऊन वाहन चालविणारे, मुलींची छेड काढणारे, अफवा पसरविणारे, आदिंची माहिती स्थानिक पोलिसांना अथवा नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला त्वरित देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी थर्टीफर्स्ट साजरा करताना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे थर्टीफर्स्ट साजरा करणाऱ्यांनी मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये, दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी वाहन चालविताना सिट बेल्टचा वापर करावा, अतिवेगाने वाहन चालवू नये, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करु नये, असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे.  

वाहतूक पोलिसांकडून ‘ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह'ची विशेष मोहिम राबविण्यात येणार असून संशयित मद्यपी वाहन चालकाची सर्वप्रथम ब्रेथ ॲनालायझर्स द्वारे तपासणी करुन नंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यात दोषी आढळणाऱ्यांवर दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्यांवर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

नागरिकांनी २०२३ या नुतन वर्षाचे स्वागत करताना राज्य शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन उत्साहाने आणि सुरक्षितपणे साजरा करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. -मिलिंद भारंबे, पोलीस आयुवत-नवी मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बेलापूर विधानसभा क्षेत्रात भव्य आगरी-कोळी भवन उभारण्याची सौ. मंदाताई म्हात्रे यांची मागणी