1 वर्षे 10 महिन्याच्या चिमुकलीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
पनवेलमधील चिमुकल्या सियाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
नवी मुंबई : ज्या वयात व्यवस्थित बोलता येत नाही, उभंही राहता येत नाही. अशा वयात 25 राष्ट्रध्वज ओळखणा-या पनवेल मधील करंजाडे येथील सिया कैकाडी या 1 वर्षे 10 महिन्याच्या चिमुकलीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद घेतली आहे. नुकतेच सियाला इंडिया बुक ऑफ रेकॉड्सकडुन गौरविण्यात आले आहे. चिमुकल्या सियाची इतक्या कमी वयात इंडिया बुक ऑफ रेकॉड्समध्ये नोंद झाल्याने तिच्या तिक्ष्ण बुद्धिमत्तेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पनवेलच्या करंजाडे भागात राहणारी सिया सचिन कैकाडी या चिमुकलीचे वय अवघे 1 वर्षे 10 महिने इतके आहे. या वयात सियाने अवघ्या 2 मिनिटे 30 सेकंदात 25 राष्ट्रध्वज ओळखले आहेत. समोर ठेवलेल्या राष्ट्रध्वजाच्या देशांचे नाव पुकारल्यानंतर सियाने अचुकपणे राष्ट्रध्वज ओळखले आहेत. त्यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने तिची नोंद घेऊन तिचा गौरव केला आहे.
सियाच्या या तिक्ष्ण बुद्धिची पारख तिची आई सुप्रिया यांनी केली. त्यानंतर सुप्रिया यांनी सियाची नियमित उजळणी सुरु केली. यात सियाकडुन कौतुकास्पद प्रतिसाद मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर सुप्रिया यांनी हा गुण ओळखुन सुप्रिया कैकाडी यांनी सियाचा व्हिडीओ इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला पाठविला होता. त्यानंतर गत 15 डिसेंबर रोजी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडुन तिच्या रेकॉर्डची नोंद घेऊन तिला गौरविण्यात आले. सियाचा हा विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या 2023 च्या बुकमध्ये नोंद करण्यात येणार आहे. तसेच संकेतस्थळावर देखील त्याची नोंद होणार आहे.
सिया 9 महिन्याची असतानाच ती सगळ्या देशाचे झेंडे ओळखत होती, दिवसातून तीनवेळा प्रत्येकी पाच मिनीटे अगदी हसत खेळत सियाचा अभ्यास झाला. यातूनच सिया सर्व गोष्टी ओळखु लागल्याचे सुप्रिया कैकाडी यांनी सांगितले. याशिवाय चिमुकली सिया ए टू झेड अल्फाबेट ओळखत. त्याचप्रमाणे 14 भाज्या, 17 शरीराचे भाग, 19 जंगली प्राणी, 18 फळे ओळखते. या व्यतिरिक्त डॉक्टर्स, छायाचित्रकार, ग्रह तारे, सैनिक यांना देखील सिया त्वरित ओळखत असल्याचे सुप्रिया कैकाडी यांनी सांगितले.