फळ मार्केट मध्ये दीड टन प्लास्टिकचा साठा जप्त

नवी मुंबई ः ‘प्लास्टिकमुक्त नवी मुंबई'चे ध्येय नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महापालिकेच्या सर्वच विभागांमध्ये प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमांना गती प्राप्त झालेली दिसत आहे. किरकोळ प्लास्टिक विक्रेत्यांप्रमाणेच प्रतिबंधात्मक प्लास्टिकच्या साठ्यांवर धडक कारवाई केली जात आहे.

अशाच प्रकारची कारवाई तुर्भे एपीएमसी मार्केट मधील २ दुकानांवर करण्यात येऊन सदर ठिकाणाहून ४ ते ५ ट्रक भरेल इतक्या मोठ्या प्रमाणात साधारणतः १.५ टन प्लास्टिक पिशव्या आणि प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला. सदरची कारवाई घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी सुखदेव येडवे आणि विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या माध्यमातून राबविण्यात आली.

एपीएमसी मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्या आणि प्रतिबंधात्मक प्लास्टिक आढळून येत असल्याच्या अनुषंगाने विभाग कार्यालयामार्फत सदर परिसरात नियमितपणे कारवाई करण्यात येत असते. त्यामध्ये तुर्भे एपीएमसी फ्रुट मार्केट अंतर्गत सेक्टर-१९ येथील २ दुकानदारांकडे प्रतिबंधात्मक प्लास्टिक आढळल्याने  कारवाई करण्यात आली. यामध्ये साधारणतः १५०० किलो प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला. तसेच १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सदर जप्त केलेला प्लास्टिकचा साठा महापालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा प्रकल्पस्थळी नेण्यात येऊन त्याच्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वाशी, सेवटर-१९ फ्रुट मार्केट सेंट्रल फॅसिलिटी बिल्डींग येथील हाय ग्रीप पॅकेजिंग तसेच बाबा साई पॅकेजिंग या व्यावसायिकांकडेही प्रतिबंधात्मक प्लास्टिक आढळले. यावेळी त्यांचा पहिल्यांदाच गुन्हा असल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे एकूण १० हजाररुपये इतका दंड वसूल करण्यात आला.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाया तीव्रतेने राबविण्यात येत आहेत. नागरिकांनीही प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे थांबवून कापडी पिशव्यांचा वापर करावा आणि प्लास्टिकला आपल्या दैनंदिन वापरातून हद्दपार करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. -अभिजीत बांगर, प्र.आयुवत-नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

1 वर्षे 10 महिन्याच्या चिमुकलीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद