पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या संबंधित अभियंत्याविरुध्द कारवाई करण्याची मागणी

पामबीच मार्गावरील सायकल ट्रॅक अडचणीत

नवी मुंबई ः नवी मुंबईमध्ये पामबीच मार्गावर सुमारे ११.५८ कोटी रुपये खर्चून सायकल ट्रॅक बनविण्यासह परिसराच्या सुशोभिकरणाचे काम महापालिकेच्या माध्यमातून सुरु करण्यात आले आहे. पण, पामबीच वरील सायकल ट्रॅक मार्गावर नियमबाह्य पध्दतीने कामे सुरु असून यात तेथील हिरवळीसह लहान-मोठी झाडे देखील तोडण्यात येत असल्याची तक्रार ‘शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)'चे शहरप्रमुख विजय माने यांनी महापालिका आयुवतांकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या संबंधित अभियंत्याविरुध्द कारवाई करण्याची मागणी देखील विजय माने यांनी आयुवयांकडे केली आहे. नवी मुंबई महापालिकेने ११.५८ करोडो रुपये खर्च करुन सायकल टॅ्रकचे निर्माण करण्याचे काम चालू आहे. शहरात विकास कामे झाली पाहिजेत, नागरिकांना सेवा, सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत याबद्दल आमच्या मनात दुमत नाही. मात्र, सदरी कामे होत असताना निसर्गाचे संवर्धन अबाधित राखणे आपली जबाबदारी आहे. पामबीव मार्गावर सायकल ट्रॅकचे काम चालू झाल्यावर तेथे असलेली हिरवळ, लहान-मोठी झाडे तोडण्यात येत आहेत. यासंदर्भात विभागातील नागरिकांनी आमच्या कार्यालयात येऊन नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मी स्वतः घटनास्थळी भेट दिली असता वस्तुस्थिती पाहिली. तसेच महापालिका उद्यान विभागाकडून माहिती अधिकारात माहिती मिळविली असता सदर ठिकाणी सुरु असलेले काम विनापरवानगी चालू असल्याचे समजले, असे विजय माने यांनी महापालिका आयुवतांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. तसेच काम सुरु असलेल्या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास होत असून महापालिकेच्या स्थापत्य विभागाने लाखो रुपये खचुन केलेल्या कामांची देखील तोडफोड झालेली आहे. त्यामुळे सदर नियमबाह्य कामाची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने संबंधित अभियंत्यांवर देखील कारवाई करावी, अशी मागणी विजय माने यांनी केली आहे. दरम्यान, आलेल्या तक्रारी नंतर आम्ही कामाची पाहणी केली आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारे झाडांना इजा न पोहोचविता आणि महत्वाचे म्हणजे झाडांना वाचवून तसेच डायवर्ट करुन काम सुरु केलेले आहे. त्यासाठी कामाचे ड्रॉईंगही बदललेले आहे. यासंदर्भात विभागीय वन अधिकारी आणि जिल्हा वन अधिकारी यांच्या अहवालानुसार बाधित होणाऱ्या झाडांबाबत निर्णय घेण्याकरिता महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एम.सी.झेड.एम.ए.) आणि सी.आय.ए. या दोन शासकीय संस्थाकडून परवानगी घेतलेली आहे. तरीही तुर्तास आम्ही सदरचे काम थांबविले असून सदर दोन संस्थांकडे झालेल्या बैठकीचे इतिवृत्त महापालिकेला प्राप्त होताच आम्ही मुंबई उच्च न्यायालयाकडून या कामासाठी परवानगी घेऊ. सदर इतिवृत्त महापालिकेला या किंवा पुढच्या आठवड्यात मिळण्याची शवयता असल्याचे महापालिकेचे नेरुळ विभाग कार्यकारी अभियंता गिरीश सुमास्ते यांनी सांगितले.

पर्यावरणाचा ऱ्हास करुन विकास कामे होत असतील तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. वृक्षतोड होत आहेच; त्याचबरोबर स्थापत्य विभागाने लाखो रुपये खर्चुन केलेल्या कामाची तोडफोड करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका आयुवतांनी सदर नियमबाह्य कामाची निश्चित दखल घ्यावी. तसेच या कामाला सहाय्य करणाऱ्या अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी आयुवतांकडे केली आहे. -विजय माने, शहरप्रमुख-शिवसेना.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

फळ मार्केट मध्ये दीड टन प्लास्टिकचा साठा जप्त