महापालिका मार्फत  दिवाळेगांव मासळी मार्केट मधील कचरा विल्हेवाटीचा देशातील पहिलाच प्रकल्प

दिवाळेगांव मासळी मार्केटमध्ये ‘फिश फीड' प्रकल्प

नवी मुंबई ः ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२२'मध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त केल्यानंतर सदरचे  मानांकन ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३' मध्ये उंचावण्यासाठी नवी मंबई महापालिका सज्ज झालेली आहे. यादृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर दिला जात असून अशाच प्रकारे एक अभिनव उपक्रम ‘फिश फीड' दिवाळेगांव मार्केट येथे प्रायोगिक स्वरुपात राबविला जात आहे.

विविध प्रकारच्या कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली जात असताना मासळी मार्केट मधील कचरा देखील एक वेगळा आणि महत्वाचा भाग आहे. मासळी मार्केट मधील कचऱ्यावर अत्याधुनिक पध्दतीने प्रक्रिया करुन त्यापासून मत्स्य खाद्य तयार करण्याचा अत्यंत आधुनिक असा फिश फीड प्रकल्प दिवाळेगांव येथील मासळी मार्केट मध्ये प्रायोगिक स्वरुपात राबविला जात आहे. फिशवर्कर्स वेल्फेअर फेडरेशन ऑफ इंडिया या भारत सरकार मान्यताप्राप्त संस्थेचा वतीने एक टन क्षमतेचा सदर फिश फीड प्रकल्प दिवाळेगांव मासळी मार्केट मध्ये प्रायोगिक स्वरुपात कार्यान्वित करण्यात आला आहे. याविषयीचा सामंजस्य करार महापालिका आणि संस्थेमध्ये झालेला आहे.

मासळीच्या कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प देशातील काही मोठ्या शहरांतील खाजगी संस्थांमध्ये राबविले जात आहेत. मात्र ‘फिश फीड' मासळी मार्केट मधील कचरा विल्हेवाटीचा नवी मुंबई महापालिकेच्या पुढाकारातून कार्यान्वित प्रकल्प स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत राबविला जाणारा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. यामुळे नवी मुंबई महापालिका आणखी एका नाविन्यपूर्ण उपक्रमाचा आरंभ करण्यामध्ये देशात अग्रणी ठरली आहे.

२०० किलो मासळीच्या कचऱ्याची एक बॅच अशा दिवसभरात पाच बॅचेस अशी या प्रकल्पाची क्षमता असून या प्रक्रियेमध्ये मार्केटमध्ये निर्माण होणारा मासळीचा कचरा एकत्रित करुन यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने अत्यंत बारीक केला जाणार आहे. त्यानंतर त्याचे द्राव्य स्वरुपातील मत्स्य खाद्‌य म्हणून रुपांतर करण्यात येणार आहे. या कार्यवाहीकरिता मासळी मार्केट मधील मासळी विक्रेत्या महिलांचे विशेष सहकार्य लाभणार असून तेथील महिला बचत गटांमधील दोन महिलांना याठिकाणी रोजगारही उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून त्यांचेही सक्षमीकरण होणार आहे.

या प्रकल्पासाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यापासून ते सदर प्रकल्प कार्यान्वित राखण्याची संपूर्ण जबाबदारी फिशवर्कर्स वेल्फेअर फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेने उचलली असून महापालिकेसोबत तशा प्रकारचा सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.

केंद्र सरकार अंगिकृत भारतीय कृषि अनुसंधान परिषद (घ्ह्‌ग्ीहण्दल्हम्ग्त् दि ींुीग्म्ल्त्ूल्ीा Rोाीीम्प्) यांच्यामार्फत पुरविण्यात आलेल्या तंत्रज्ञानानुसार फिश फीड प्रकल्प फिशवर्कर्स वेल्फेअर फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेमार्फत दिवाळे गावातील मासळी मार्केटमध्ये प्रायोगिक स्वरुपात राबविण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. येथील यशस्वीतेनंतर टप्प्प्याटप्प्याने इतरही मासळी मार्केटमध्ये सदर कार्यप्रणाली राबविण्याचे नियोजन आहे. याठिकाणी ५० किलोच्या ट्रायल बॅच मधून निर्माण झालेले द्राव्य स्वरुपातील मत्स्य खाद्य तपासणीकरिता ‘आयसीएआर'च्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहे.

सदर प्रकल्पाचा संपूर्ण खर्च फिशवर्कर्स वेल्फेअर फेडरेशन ऑफ इंडिया मार्फत केला जात असून महापालिकेचा यामध्ये कोणताही निधी खर्च होत नाही. या प्रकल्पामुळे मासळी मार्केट मधून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळापर्यंत वाहून न्यावा लागणारा कचरा निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया होणार असल्याने तो वाहून न्यावा लागणार नाही. त्यामुळे कचरा संकलन आणि वाहतूक खर्चात बचत होणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होत असलेल्या ठिकाणच्या कचऱ्यावरील प्रक्रिया त्याच ठिकाणी केली जावी या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीतील नियमाचीही अंमलबजावणी होणार आहे. त्याचप्रमाणे या माध्यमातून काही महिलांनाही रोजगार उपलब्ध होणार असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृृष्टीनेही सदर प्रकल्प उपयोगी आहे.

अशा प्रकारे स्वच्छता कार्यात नवनवीन संकल्पना राबवित नवी मुंबई महापालिका शहर स्वच्छतेबाबत अत्यंत जागरुकतेने काम करीत असून स्वच्छता कार्यात बदलत्या जगाचा अदमास घेत नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. फिश फीड सारखा अभिनव प्रकल्पही आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीतील एक महत्वाचा आणि नाविन्यपूर्ण असा बहुपयोगी उपक्रम आहे. -अभिजीत बांगर, प्रभारी आयुवत- नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रशिक्षण शिबीरामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत -सुरेश मेंगडे