गीतनृत्यात्मक ‘पलॅश मॉब'द्वारे स्वच्छता संदेश प्रसारण

 

‘नवी मुंबई महापालिका स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष'च्या वतीने इनॉर्बिट मॉल आणि सीवुडस्‌ ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये पलॅश मॉब अभिनव संकल्पना

नवी मुंबई ः ख्रिसमस अर्थात नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर नवीन वस्तू खरेदीचा बाजारपेठांतील उत्साही माहौल लक्षात घेऊन या गर्दीमध्ये स्वच्छता संदेशाचा प्रसार होण्याच्या दृष्टीने ‘नवी मुंबई महापालिका स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष'च्या वतीने इनॉर्बिट मॉल आणि सीवुडस्‌ ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये पलॅश मॉब अशी अभिनव संकल्पना उत्साहाने राबविण्यात आली. सदर दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येने कुटुंबासह उपस्थित असलेल्या नागरिकांनी पलॅश मॉब मधील गीतनृत्यांना उत्तम प्रतिसाद देत यातील शंभरहून अधिक कालाकलाकारांसह ‘निश्चय केला, नंबर पहिला'चा गजर केला. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा ‘स्वच्छ भारत अभियान'चे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी उपस्थित नागरिकांना कचरा वर्गीकरण आणि त्याच्या सुयोग्य विल्हेवाट पध्दतीचे तसेच प्लास्टिक पिशव्यांना ठाम नकार देत कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्याविषयीचे आवाहन केले.

यावर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'ला सामोरे जात असताना गतवर्षीचे देशातील तृतीय क्रमांकाचे मानांकन उंचाविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने जोरदार प्रयत्न सुरु केले असून आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार व्यापक लोकसहभाग घेत विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून पलॅश मॉबची संकल्पना राबविण्यात आली, ज्यामधील गीतनृत्यांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुकाची दाद दिली.

सर्वसाधारणपणे सणाच्या दिवशी मॉलमधील वातावरण खरेदीच्या उत्साहाचे असताना अचानक सगळीकडून वाद्ये वाजू लागतात आणि लोकांना काही कळण्याच्या आत चोहोदिशांनी शेकडो युवक-युवती मॉलच्या मधील मोठ्या जागेत एकत्र येऊन लोकप्रिय गाण्यांवर नाचू लागतात. हे अचानक काय झाले ते बघण्यासाठी सगळे त्यांच्या आसपास दुतर्फा जमतात आणि उत्सुकतेने बघू लागता. त्यातील काही गाण्यांतून स्वच्छता संदेशाचे प्रसारण होते आणि नागरिकांच्या मनावर कचरा वर्गीकरणाचा तसेच स्वच्छतेचा संदेश बिंबविण्यासाठी पलॅश मॉबची अनोखी संकल्पना महापालिकेने राबविली असल्याचे लोकांना कळते. मग लोकही ‘स्वच्छताविषयी जनजागृती'च्या सदर पलॅश मॉब उपक्रमात स्वयंस्फुर्तीने सहभागी झाल्यामुळे स्वच्छतेचा एकच जागर केला जातो.

   इनॉर्बिट आणि सीवुडस्‌ मधील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये कोणतीही पूर्वकल्पना नसताना अचानक घडविलेल्या पलॅश मॉब मुळे स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत अनोख्या पध्दतीने पोहोचविण्यात आला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शेकडो मुलांना पारंपारिक बैठ्या, मैदानी खेळांचे मार्गदर्शन