एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात सुरक्षा रक्षकांकडून टोल वसुली?

वाशी ः वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमालाची वाहनांद्वारे आवक-जावक होत असते. मात्र, एपीएमसी मार्केटमध्ये शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहन चालकांची एपीएमसी बाजार आवारात सुरक्षा रक्षकांकडून मोठी लुटमार सुरु असून, वाहन बाहेर पडताना १० ते २० रुपये घेऊन टोल वसुली केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मार्केट आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ आहे. त्यामुळे राज्यातील हजारो शेतकरी त्यांचा शेतमाल विक्रीसाठी वाहनांमधून एपीएमसी मार्केट मध्ये पाठवतात. तर तेवढ्याच प्रमाणात विक्री झालेला शेतमाल बाहेर जातो. मात्र, या मधल्या काळात येथील सुरक्षा रक्षकांकडून वाहन चालकांची मोठी लुटमार होत असल्याचा आरोप वारंवार होत आह. ‘एपीएमसी मार्केट'च्या बाजूला असलेल्या ट्रक टर्मिनल मध्ये गृहनिर्माण प्रकल्प सुरु असल्याने ‘वाहन पार्किंग'ची समस्या जटील झाली आहे. त्यामुळे शेतमाल घेऊन येणारी वाहने रात्री बाजार आवारात आसरा घेतात. मात्र, या ठिकाणी रात्री वेळी गाडी उभी करण्यासाठी १०० ते १५० रुपये अवैधरित्या आकारुन मोठी लुटमार होत असल्याचा आरोप कांदा-बटाटा व्यापाऱ्यांकडून  होत आहे. तर शेतमाल खरेदी केल्यानंतर बाहेर पडणाऱ्या वाहनांना प्रवेश द्वारावर अडवून सदर वाहन चालकांकडून १० ते २० रुपये घेतले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पैसे देण्यास नकार देणाऱ्या वाहनांची नाहक अडवणूक करून त्यांच्या सोबत गैरर्वतन केले जात असल्याचा आरोप देखील होत आहे. वसूल केलेल्या पैशापैकी काही पैसे खालपासून वरपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना द्यावे लागत असल्याचे संभाषण या व्हिडीओत कैद झाले आहे. त्यामुळे एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारातील टोल वसुली एपीएमसी अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरु असल्याने या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर  कारवाई करण्याची मागणी वाहन चालकांकडून होत आहे.


एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारात वाहन चालकांकडून सुरक्षा रक्षक कुठल्याही प्रकारे पैसे घेत नाहीत. वाहन चालकांकडून सुरक्षा रक्षक पैसे घेत असल्याचा काही प्रकार सुरु असेल तर त्या वाहन चालकांनी आमच्याकडे लेखी तक्रार करावी. असल्या प्रकरणात आम्हाला नाहक गोवण्याचा प्रकार काही जणांकडून सुरु आहे. - संजीव नारंगकर, पर्यवेक्षक - सुरक्षा रक्षक, कांदा-बटाटा बाजार, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती - वाशी. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गीतनृत्यात्मक ‘पलॅश मॉब'द्वारे स्वच्छता संदेश प्रसारण