वाशी विभागात पाणीबाणी


वाशी ः वाशी सेक्टर-९ मध्ये एका खाजगी कंपनीद्वारे केबल टाकताना सुरु असलेल्या खोदकामात पाण्याची पाईप लाईन फुटली. त्यामुळे वाशी सेक्टर-९,१० आणि १५ या भागात २४ डिसेंबर रोजी रात्रीपासून पाणी समस्या निर्माण झाली असून, नागरिकांना टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.


नवी मुंबई महापालिकेकडे स्वतःच्या मालकीचे मोरबे धरण आणि पुरेसा पाणी साठा असतानाही मानवी चुकांमुळे गेल्या अडीच दिवसापासून वाशी मध्ये अघोषित पाणीबाणी झाली आहे. केबल टाकताना खोदकाम करताना पाण्याची वाहिनी फुटल्याने आणि वेळेवर दुरुस्ती करण्यात अपयश आल्याने  आता २५, २६ डिसेंबर रोजी टँकर द्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुष्की महापालिकावर आली आहे. वाशी सेक्टर-९ येथे जमिनीखाली केबल टाकणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीकडून पाण्याची वाहिनी फुटली. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. पाण्याची वाहिनीच फुटल्याने तेथील पाणीपुरवठा बंद करण्यात आला. मात्र, त्यामुळे सद्य स्थितीत या वाहिनीद्वारा पाणी पुरवठा होत असलेल्या वाशी सेक्टर-९, १०, १० अ आणि १५ मध्ये पाणी पुरवठा बंद झाला होता. जलवाहिनीचे दुरुस्ती काम युध्दपातळीवर सुरु करण्यात आले असल्याचे महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात येत असले तरी २६ डिसेंबर रोजी पाणी नसल्याचा तिसरा दिवस होता. त्यामुळे पाणीपुरवठा बंद झालेल्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढवली आहे. मात्र, टँकर द्वारे पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांची पाणी घरी नेताना चांगलीच दमछाक उडाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.


जमिनीखाली केबल टाकणाऱ्या एजन्सी कडून जलवाहिनी फुटली असून, शक्य तेवढ्या लवकर दुरुस्त करण्यात आली. जलवाहिनी दुरुस्ती काळात टँकर द्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. खोदकामसाठी विभाग स्तरावरुन कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे विना परवानगी खोदकामाची माहिती घेऊन झालेल्या नुकसानी बाबत संबंधीत व्यक्ती, एजन्सी विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. २६ डिसेंबर रोजी दुपार पर्यंत वाशी विभागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. - दत्तात्रय धनवट, सहाय्यक आयुक्त - वाशी,विभाग, नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात सुरक्षा रक्षकांकडून टोल वसुली?