मनपा अधिकाऱ्यांचा शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ
नवी मुंबई:- कोपरी येथे शाळेच्या वास्तूचे दुरुस्तीच्या नावाखाली काम सुरू आहे. मात्र सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच कंत्राटदाराने शाळा सुरू असतानाच बांधकाम सुरू केल्याने प्रशासन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
मागील वर्षी नवी मुंबई शहरात मर्जीतील ठेकेदारांमार्फत विना निविदा काम केल्याचे पडसाद राज्याच्या अधिवेशनात उमटले होते. मात्र त्यातून मनपा स्थापत्य विभागाने कुठलाच बोध घेतला नसून उलट अभियांत्रिकी अधिकाऱ्यांची मुजोरी आणखी वाढल्याचा प्रत्यय येतो आहे. विना कार्यादेश कोपरी गावात सुरू असलेल्या शाळेच्या दुरुस्ती कामावरून हेच दिसून येत आहे. या ठिकाणी शाळा क्रमांक ३० च्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र सदर काम विनाकार्यादेश सुरू केले आहे. या शाळेत शिकणाऱ्या ८१० विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळ मांडण्यात आला आहे. बांधकाम करताना किंवा दुरुस्ती करताना सुरक्षा विषयक आवश्यक काळजी घेतली जात नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. अधिकारी एखादी दुर्घटना घडल्यावर जागे होतील का असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे. मात्र या चिंतेने पालक चांगलेच धास्तावले आहेत. दुर्दैवाने जीवावर बेतणारी एखादी दुर्घटना घडली तर यास जबाबदार कोण ? असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नवी मुंबई महानगरालिकेच्या वतीने २००६ साली कोपरी गाव शाळा क्रमांक ३० च्या इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यांनतर दोन मजली असलेल्या या इमारतीवर २०१८ साली छतावर अतिरिक्त बांधकाम करून वर्गखोल्या बांधण्यात आल्या. छतावार केलेल्या बांधकामाचा भार आणि २००६ साली केलेले बांधकाम हे निकृष्ट ठरल्याने अवघ्या १५ वर्षात ही इमारत धोकादायक झाली. त्यामुळे आयआयटीच्या अहवालानुसार या इमारतीचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती उपअभियंत्यानी दिली. त्यासाठी ऑक्टोबर महिन्यात निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र यशस्वी निविदाधारक कंत्राटदाराने निविदा प्रक्रिया अजुन शिल्लक असताना कार्यादेश मिळण्याच्या आधीच काम सुरू करण्याचा आगावूपणा केला आहे. निविदा प्रक्रिया अंतरिम टप्प्यात असून देखील ठेकेदाराने आपले काम सुरू केले असून अजून या कामाचे कार्यादेश देण्यात आले नाहीत अशी माहिती उपअभियंत्यांनी दिली. मात्र सदर काम करताना ठेकेदारामार्फत येथे शिक्षण घेत असलेल्या ८१० विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळ सुरू ठेवला आहे. कारण शाळेत शिक्षण सुरू असतानाच आणि इमारत धोकादायक असून देखील येथे इमारतीच्या खांबांसाठी खोदकाम केले जात आहे. एखादी इमारत धोकादायक असेल तरी ती रिकामी करण्याची नोटीस पालिका देते. मात्र कोपरी गावातील शाळा धोकादायक झाली असताना देखील या ठिकाणी विद्यार्थ्याच्या बाबतीत कुठलीच सुरक्षात्मक उपाययोजना न राबवताच लहानग्यांच्या जीवाशी खेळ खेळत मनपाने मर्जीतल्या ठेकेदारामार्फत काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे सदर काम सुरू असताना विद्यार्थांच्या बाबतीत काही अनुचित प्रकार घडला तर त्यास जबाबदार कोण ? असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
२०१८ साली कोपर खैरणे सेक्टर ११ येथील महापालिका सी.बी एस ई या शाळेच्या इमारतीचा प्रवेश द्वार (गेट) अंगावर पडून एक मुलाचा मृत्यू व एक मुलगा जखमी झाला होता. मुले या गेटवर खेळत होती. त्या प्रकरणात कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला होता व दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले होते. कोपरी गावात सध्या शाळा सुरू असतानाच ठेकेदारामार्फत विनाकार्यादेश काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे असा काही अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे.
तुर्भे विभागाचा नुकताच कार्यभार हाती घेतला आहे. त्यामुळे याबाबत सोमवारी अभियंत्यांमार्फत सविस्तर माहिती घेतो. संजय पाटील, कार्यकारी अभयंता,तुर्भे.विभाग, न.मुं. म.पा.
कोपरी गाव शाळा क्रमांक ३० मध्ये शाळा सुरू असताना ठेकेदारामार्फत बांधकाम किंवा इतर काम सुरू असेल तर विद्यार्थ्याच्या बाबतीत दक्षता घेण्याकरिता स्थापत्य विभागाला पत्र लिहून सूचना देण्यात येतील. - योगेश कडूसकर, शिक्षण अधिकारी, नवी मुंबई महानगर पालिका.