मच्छीमारांचा विरोध

 मोरा भाऊचा धक्का रो रो चे काम अडचणीत

 उरण : मोरा भाऊचा धक्का दरम्यान 75 कोटी खर्चाच्या रो रो सेवेच्या कामाला सुरुवात करताना येथील स्थानिक मच्छीमारांना कोणत्याही प्रकारे विचारात घेतलेले नाही. या कामामुळे येथील शेकडो कुटुंबे उध्वस्त होणार असल्याने संतप्त झालेल्या स्थानिक मच्छीमारांनी रो रो च्या कामाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असतानाच यात विविध मागण्यांच्या समस्यांची सोडवणूक होईपर्यंत रो रो सेवेचे काम बंद करण्यात यावे असा निर्णय मंगळवार दिनांक 20 रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. मोरा भाऊचा धक्का दरम्यान 75 कोटी खर्चाच्या रो रो सेवेच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र रो रो सेवेचे काम सुरू करताना  येथील स्थानिक मच्छीमाराना  कोणत्याही प्रकारे विचारात घेतलेले नाही. या मोरा बंदरातून स्थानिक मच्छीमारांच्या  सुमारे 300 नौका मासेमारी व्यवसाय करीत आहेत. या मासेमारी व्यवसायावरच 4000  स्थानिक मच्छीमार कुटुंबे आपला उदारनिर्वाह करीत आहेत. या कामामुळे स्थानिक  मच्छीमार बाधित होणार आहेत. तर काही राहती घरे देखील बाधित होण्याची शक्यता आहे. दरम्यान स्थानिक मच्छीमारांच्या समस्या समजून न घेताच आणि त्यांना अंधारात ठेवून महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने मोरा भाऊचा धक्का रो रो सेवेचा घाट घातला आहे. मोराबंदर, मोरा कोळीवाडा येथील स्थानिक मच्छीमारांना विचारात न घेता, रो रो जेटीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे संतप्त मच्छीमारांनी मंगळवारी बैठकीचे आयोजन केले होते. पुनर्वसन  पुनर्वस्थापना  करण्याच्या अनुषंगाने कोळी समाजाच्या न्याय हक्क व विविध मागण्यांसाठी येथील एकविरा देवीच्या मंदिरात मोरा कोळीवाडा ग्राम विकास समितीच्या माध्यमातून बैठकीचे  आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला ओबीसी नेते राजाराम पाटील अध्यक्ष प्रशांत कोळी, उपाध्यक्ष हेमंत कोळी, सचिव सुहास कोळी, सहसचिव सुनील कोळी, खजिनदार शेखर कोळी, सहखजिनदार नंदादीप कोळी, रवींद्र चव्हाण तसेच अन्य सदस्य उपस्थित होते. रो रो जेटीच्या कामाला विरोध दर्शवीत 2013  च्या कायद्यातील तरतुदी धाब्यावर बसून काम सुरू करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला. या सर्व मागणीसाठी  न्यायालयीन लढा देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जयपूर फूट शिबीर उत्साहात संपन्न