दुसरी मोठी कारवाई ; तुर्भे येथे प्लास्टिक पिशवी साठा जप्त

तुर्भे मध्ये २.३० टन प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी साठा जप्त

नवी मुंबई ः प्लास्टिकमुवत नवी मुंबई शहर असे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात प्लास्टिक प्रतिबंधात्मक जनजागृती, प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांच्या वापराची सवय नागरिकांना लागावी यादृष्टीने मार्केटस्‌ मध्ये कापडी पिशव्यांचे विनामुल्य वाटप असे उपक्रम राबविण्याबरोबरच प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाया मोठ्या प्रमाणावर राबविल्या जात आहेत.    

अशाच प्रकारची प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाई करीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी सुखदेव येडवे आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांसमवेत तुर्भे येथे २ टन ३०किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला. तसेच ५० हजार रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. दहा दिवसांपूर्वीच तुर्भे विभागातूनच १ टन २०० किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले होते. त्यानंतर त्याच विभागात सदरची दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईमध्ये तुर्भे येथील मसाला मार्केट मधील विधी प्लास्टिकचे गोडाऊन, ग्रोमा सेंटरमधील गाला ब्रदर्स, जयेश कुमार, सिंघवी प्लास्टिक या व्यावसायिकांवर दुसऱ्यांंदा प्रतिबंधात्मक प्लास्टिक वापराचा गुन्हा दाखल झाल्याने प्रत्येकी १० हजार रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांच्याकडील प्लास्टिक पिशव्यांचा साठाही जप्त करण्यात आला.

त्याचप्रमाणे तुर्भे येथील मर्चंट सेंटर मधील न्यू मार्ट आणि ओम फरसाण मार्ट या दोन दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्या आढळल्याने पहिला गुन्हा म्हणून त्यांच्याकडून प्रत्येक ५ हजार रुपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. याप्रमाणेच २१डिसेंबर रोजी तुर्भे, सेक्टर-१९ येथील थर्माकोल गोडाऊनवर अचानक छापा टाकून २३९ बॉक्स जप्त करण्यात आले. तसेच त्यात असलेले साधारणतः ३५० किलो वजनाचे थर्माकोल जप्त करण्यात आले. या व्यावसायिकाकडून १० हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कायदेविषयक जनजागृती या विषयावर मार्गदर्शन