नागरिकांनी महापालिकेच्या कामावर नाराजगी केली व्यक्त

नवी मुंबई ः नेरुळ, जुईनगर विभागातील नागरिकांना मागील काही दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडून होत असलेल्या दुषित पाण्याच्या पुरवठ्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार होणाऱ्या दुषित पाणी पुरवठ्याने नागरिकांनी नेरुळ-जुईनगर नोडमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाची तपासणी करण्याची मागणी केली आहे.

दुषित पाण्यामुळे अनेक घरांमधील लोक, लहान बालके, महिला आजारी पडू लागल्या आहेत. या अगोदर देखील सदर बाब महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेली आहे. मात्र, तरीही जुईनगर, नेरुळ विभागातील दुषित पाण्याच्या समस्येचे निवारण झाले नाही. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या कामावर नाराजगी व्यक्त केली आहे.

नेरुळ, सेक्टर-२,४,१६,१८, शिरवणे गांव सेक्टर-१ आणि जुईनगर नोड मध्ये गेल्या काही महिन्यांपासून दुषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिकांना पोटदुखी सारख्या वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. तसेच लहान मुले, बालके, गर्भवती महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. परिणामी, जुईनगर-नेरुळ नोडमध्ये पाण्याचा पुरवठा सुरु होतो, त्या जलकुंभांची सातत्याने तपासणी होणे आवश्यक आहे. काही महिन्यापूर्वी जुईनगर रेल्वे स्टेशन जवळच्या जलकुंभामध्ये दोन दिवस मृतदेह पडून होता. परंतु, महापालिका प्रशासनाला याची कोणती गंधवार्ताही नव्हती. जुईनगरवासियांना त्याच पाण्याचा पुरवठा झाला. दुषित पाण्याच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी नेरुळ-जुईनगर नोडमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी, अशी मागणी जुईनगर, नेरुळ नोडमधील रहिवाशांनी स्थानिक नेत्यांकडे केली आहे.

जुईनगर- नेरुळ नोडमध्ये पाण्याचा पुरवठा सुरु होतो, त्या जलकुंभांची सातत्याने तपासणी करण्यासाठी मागणी करणारे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले आहे. आयुवतांना पाणी पुरवठा विभागातील संबंधितांना निर्देश देण्याची विनंती केली आहे. -विद्या भांडेकर, सचिव-नवी मुंबई जिल्हा काँग्रेस. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दुसरी मोठी कारवाई ; तुर्भे येथे प्लास्टिक पिशवी साठा जप्त