वाशी, नेरुळ, ऐरोली रुग्णालयांमध्ये कोव्हीड लसीकरण केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश

जागतिक कोव्हीड स्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिका सतर्क

 नवी मुंबई ः चीनसह काही देशात कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नवी मुंबई महापालिकेचे प्रभारी आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाची तातडीने बैठक घ्ोत महापालिकेच्या वतीने केले जाणारे दैनंदिन कोव्हीड टेस्टींग आणि लसीकरण याविषयीचा बारकाईने आढावा घेतला.

चीनमध्ये ओमायक्रॉनच्या बीएफ ७ या उपप्रकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले असून भारतातही गुजरात आणि ओरिसा राज्यातही ४ रुग्ण आढळून आलेले आहेत. मागील कोव्हीड प्रभावीत कालखंडाचा अनुभव लक्षात घेता यापुढील काळात अधिक सतर्कता राखण्याची गरज असल्याचे सांगत आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘कोव्हीडचा धोका अजूनही टळलेला नाही',  असा संदेश जनमानसात प्रसारित करण्याची गरज असल्याचे सांगितले.

सध्या दैनंदिन ५०० हून अधिक आरटी-पीसीआर टेस्टींग आणि ६०० हून अधिक ॲन्टीजन टेस्टांीग केल्या जात असून या टेस्टींगमध्येही वाढ करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. महापालिकेची रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्र याप्रमाणेच मोठ्या प्रमाणात वर्दळ असणाऱ्या एपीएमसी मार्केट, रेल्वे स्टेशन्स याठिकाणीही कोव्हीड टेस्टींग सुरु करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असेही आयुक्त बांगर यांच्या मार्फत सूचित करण्यात आले. यासोबतच कोव्हीड लसीकरणाकडेही विशेष लक्ष देत महापालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली रुग्णालयांमध्ये कोव्हीड लसीकरण केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने लवकरच कोव्हीड प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील. त्यानुसार तत्पर कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.

यावेळी गोवर रुबेला लसीकरणाचीही स्थिती जाणून घ्ोत आयुक्त अभिजीत बांगर यांनी गोवरचा उद्रेक झालेला आहे म्हणजे २ पेक्षा अधिक रुग्ण सापडलेले आहेत, अशा ६ आऊटब्रेक क्षेत्रात सर्वेक्षण आणि लसीकणावर भर देण्याचे निर्देशित केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नागरिकांनी महापालिकेच्या कामावर नाराजगी केली व्यक्त