७५ विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे, खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तुंंची दुकाने लावून विक्री

कोपरीगांव महापालिका शाळेत ‘आठवडी बाजार'चा उपक्रम

नवी मुंबई ःनवी मुंबई महापालिका शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी सौ.अरुणा यादव यांच्या संकल्पनेतून नवीन उपक्रमांतर्गत महापालिका शाळा क्रमांक-३० कोपरी येथे २१ डिसरेंबर रोजी जीवनाभिमुख शिक्षण देण्याच्या हेतुने आठवडी बाजार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत इयत्ता सहावीच्या दोन तुकड्यांमधील एकूण ७५ विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे, खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तुंंची दुकाने लावून विक्री केली. आठवडी बाजारातून मुलांना व्यवहार ज्ञान, खरेदी-विक्री, जमा खर्च, नफा तोटा या संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव आला. श्रमाचा आनंद वेगळाच असतो.

स्वयं निर्मिती करुन श्रमप्रतिष्ठा मूल्य वृध्दींगत करण्यास मदत झाली. तसेच व्यवसाय करताना कष्ट, जिद्द आणि संयम याबरोबर नियोजनही तितकेच महत्त्वाचे असते, याचे ज्ञान मुलांना अवगत झाले. यातून मुलांमध्ये सहकार्यातून सामाजिक गुण विकसित होण्यास फार मदत झाली. स्वतःच्या कष्टाच्या मिळकतीचा मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद सुखदायक होता, असे शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बागम यांनी सांगितले. सदर उपक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ. सुलोचना बागम, इयत्ता सहावीचे वर्गशिक्षक विलास भिसे, सौ. सीमा गावीत तसेच सकाळ दुपार सत्रातील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.

यावेळी समाजसेवक परशुराम ठाकूर, पुरुषोत्तम भोईर, माजी नगरसेविका सौ. उषा भोईर, आदिंनी सदर आठवडी बाजाराला भेट देऊन सामान खरेदी करीत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. तसेच इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व
विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी देखील याठिकाणी भेट देऊन खरेदीचा आनंद लुटला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिडको'च्या महागृहनिर्माण योजना दिवाळी-२०२२ ऑनलाइन अर्ज नोंदणी मुदतवाढ