उत्तम पुस्तके वाचणे व स्व-नोंदी ठेवीत दैनंदिनी लिहायची सवयी अंगी बाणगा

गीता सार वरील संदेश देणाऱ्या नृत्यास प्रथम पारितोषिक

नवी मुंबई : नेरुळ येथील टिळक ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम २०२२ मध्ये सादर करण्यात आलेल्या आत्मन (दि सेल्फ अवेकनिंग) अर्थात स्वयंजागृती या कथाबीजावर आधारित समुहनृत्याविष्कारामध्ये अकरावी सायन्स सी व डीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘गीता सार' वरील समुहनृत्यास प्रथम पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. सुमारे तीनशेहुन अधिक विद्याथ्यार्ंनी मोठ्या उर्जेनिशी यावेळी समुहनृत्ये सादर केली.

१९ डिसेंबर रोजी वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास नादम जीएसईचे व्यवस्थापकीय संचालक रघुनंदन जगदीश, गायक संगीतकार प्रशांत नावती, नृत्यांगना श्रीजिता बॅनर्जी, गायिका सोनाली सोनावणे, टिळक एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन व संचालक डॉ अजित कुरुप, प्राचार्या डॉ. हिना सामानी, एस.के.कॉलेज, नेरुळच्या प्राचार्या विद्या मुरली, टिळक पब्लिक स्कूलच्या प्राचार्या रुबी वर्गीस आदि मान्यवर उपस्थित होते. श्रीकृष्ण आणि त्याची विविध रुपे जसे चांगला पुत्र, सुयोग्य मित्र, प्रिय सखा, सणा-उत्सवांतील कृष्ण, संगीतज्ञ म्हणून कृष्ण, नैराश्य झटकून अडचणींवर उपाय सांगणारा कृष्ण अशा विविध कथाबीजांवर आधारीत यावेळी विविध विद्यार्थीसमुहांनी सुरेख नृत्याविष्कार सादर केले. यावेळी केलेल्या भाषणात रघुनंदन जगदीश यांनी विद्यार्थ्याना संबोधित करताना आयुष्याचे उद्दीष्ट निश्चित करावे, वेळेचे मोल जाणावे, सतत शिकण्याची वृत्ती ठेवावी, चांगले आदर्श आणि उत्तम पुस्तके वाचणे व स्व-नोंदी ठेवीत दैनंदिनी लिहायची सवय ठेवणे अशा सवयी अंगी बाणवण्याचा सल्ला दिला. यावेळी शैक्षणिक, क्रीडाविषयक तसेच उत्तम वर्ग, वर्गप्रतिनिधी, वर्षभरातील सर्वांगीण उत्तम कामगिरी करण्याऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. प्राचार्या डॉ हिना सामानी यांनी प्रास्ताविक केले. धन्या नायर यांनी सूत्रसंचालनाची बाजू सांभाळली तर नितू राय यांनी आभारप्रदर्शन केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

किसान कृषी प्रदर्शन 2022 प्रदर्शनात पाणी नियोजनाचं तंत्रज्ञान मुख्य आकर्षण