स्वच्छता कार्यात नागरीक सहभागावर भर

नवी मुंबई ः लोकांच्या सहकार्याशिवाय १०० टक्के स्वच्छतेचे उद्दिष्ट गाठणे शक्य नाही. सदर बाब लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेच्या वतीने स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचून प्रसारित केला जात आहे. याकरिता आयोजित सर्वच उपक्रमांमध्ये स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरीक उत्साहाने सहभागी होत आहेत.

 कचऱ्याचे निर्मितीच्याच ठिकाणी ओला, सुका, घरगुती घातक असे ३ प्रकारे वर्गीकरण, घरातच कंपोस्ट बास्केटद्वारे ओल्या कचऱ्यातून खत निर्मिती, मोठ्या सोसायट्यांच्या आवारातच खत निर्मिती प्रकल्प राबविण्यावर भर असे विविध संदेश लोकांपर्यंत पोहोचवितानाच, त्यांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी प्रोत्साहित करण्यावर भर देत शहर स्वच्छता कार्याला गतीमानता आलेली आहे. याकरिता आठही विभागातील सोसायट्या, वसाहतींमध्ये जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांना कचरा वर्गीकरणाचे, प्लास्टिक प्रतिबंधाचे महत्व पटवून देतानाच स्वच्छतेच्या विविध उपक्रमांमध्ये नवी मुंबईकर नागरिकांचा सहभाग घेत लोकसहभागातून स्वच्छतेवर भर दिला जात आहे.

नेरुळ, सेक्टर-५४, ५६, ५८ येथील एनआरआय कॉलनी मोठी वसाहत आहे. याठिकाणी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि बेलापूर विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. मिताली संचेती यांनी फेज-१ मधील नागरिकांशी संवाद साधत त्यांना प्रत्येक घरातून वर्गीकृत कचरा देण्याचे महत्व विषद करीत ते बंधनकारक असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे इज ऑफ लिव्हींग मध्ये प्रत्येक नागरिकाने आपले शहराविषयीचे अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन केले. अशाच प्रकारे नेरुळ, सेक्टर-४८ येथील साई संगम सोसायटीमध्येही भेट देत त्यांनी सोसायटीच्या आवारातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे सूचित केले. तसेच कोकण रेल्वे कार्यालयाच्या परिसरात विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात येऊन त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये ३ आर, कचरा वर्गीकरण तसेच प्लास्टिक प्रतिबंधाविषयी जनजागृती करण्यात आली.

कोपरखैरणे, सेक्टर-११ येथील फार्म सोसायटीमध्ये त्याचप्रमाणे नेरुळ, सेक्टर-१० नेरुळ येथील एकता सोसायटीमध्ये तेथील स्वच्छता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधत कचरा वर्गीकरणाचे आवाहन केले. दिघा विभागातील त्रिमुर्ती सोसायटीमध्येही अशाच प्रकाराची जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे दिघा बिंदु माधव नगर येथील वसाहतीमध्ये कचरा वर्गीकरणाचे महत्व घराघरात जाऊन तसेच तेथील मोठ्या मोकळ्या जागेत नागरिकांना एकत्र करण्याबाबत पटवून देण्यात आले. तसेच प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगून प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे थांबविण्याचा निर्धार करावा आणि त्याऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्या वापराव्यात, असे सूचित करण्यात आले.

१८ डिसेंबर रोजी रविवार सुट्टीचा दिवस असल्याने ऐरोली विभागातील खाडी परिसरात विथ देम फॉर देम या संस्थेच्या युवा सदस्यांच्या सहयोगाने नवी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या खाडी परिसर स्वच्छता मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला. खारफुटी भागातील कचरा एकत्रित करुन तसेच त्यामधील प्लास्टिक बॉटल्स आणि प्लास्टिकचा कचरा एकत्र करुन खाडीकिनारा स्वच्छ करण्यात आला. अशाच प्रकारे बेलापूर रेल्वे स्टेशन परिसरातही प्लास्टिक आणि सुका कचरा गोळा करण्याची विशेष मोहिम स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या सहयोगाने मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली.

ऐरोली, सेक्टर-१६ येथील दत्ता मेघे वर्ल्ड ॲकेडमी येथील विद्यार्थी, शिक्षकांशी स्वच्छता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संवाद साधत त्यांना स्वच्छतेचे महत्व सांगितले. तसेच परिसरात त्यांच्या सहयोगाने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. कोपरखैरणे, सेक्टर-६ येथील मैदानात रुपश्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत मैदान स्वच्छता मोहिम यशस्वीरित्या राबविली.

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे शहर अस्वच्छ होते. शिवाय सार्वजनिक आरोग्याला बाधा पोहोचते. सदर बाब लक्षात घेऊन नेरुळ, सेवटर-१५ मधील फकिरा मार्केट तसेच वाशी, सेक्टर-१४ आणि सेवटर-२९ येथील टेम्पो नाका आणि रिक्षा स्टँड त्याचप्रमाणे धारण तलाव कोपरखैरणे परिसर याठिकाणी रिक्षा-टॅक्सी चालक, विक्रेते आणि नागरिकांचे सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याविषयी प्रबोधन करण्यात आले. वाशी, सेक्टर-१४, १५ येथील भाजीपाला आणि फळ मार्केट याठिकाणीही याविषयी जागरुकता निर्माण करीत प्लास्टिक पिशव्यांचा वापर करु नये, अशा सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे तेथील व्यापारी आणि उपस्थित ग्राहकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रॅडक्लिफ आंतर-शालेय तायक्वांदो स्पर्धेत नमुंमपा सी बी एस ई शाळा क्र.९४ च्या विद्यार्थ्यांचे सुयश