जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा महोत्सव'मध्ये ३५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

 

 ‘‘शालेय क्रीडा स्पर्धा'द्वारे विजेत्यांना थेट विभागीय स्तरावर खेळण्याची संधी

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका क्रीडा-सांस्कृतिक कार्य विभागाकडून जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून मधल्या कोरोना प्रभावित दोन वर्षाच्या दीर्घ कालखंडानंतर या स्पर्धा होत आहेत. त्यामुळे मागील स्पर्धांपेक्षा अधिक संख्येने आणि उत्साहाने विद्यार्थी सहभागी होताना दिसत आहेत. यावर्षी तब्बल २३५ शाळांनी आपली ऑनलाईन नोंदणी केलेली असून ३५ हजाराहुन अधिक विद्यार्थी खेळाडुंनी यात उत्स्फुर्त सहभाग नोंदविलेला आहे.

यावर्षीच्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सवात आत्तापर्यंत यशवंराव चव्हाण फुटबॉल मैदानावर १४,१७ आणि १९ वर्षाआतील मुले आणि मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. ऐरोली स्पोर्टस्‌ असोसिएशन येथे कॅरम आणि बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जलतरण, टेबल टेनिस आणि रायफल शुटींग स्पर्धा फादर ॲग्नल स्पोर्टस्‌ सेंटर, वाशी येथे तसेच हॅन्डबॉल आणि बॅडमिंटन स्पर्धा रायन इंटरनॅशनल स्कुल, नेरुळ येथे संपन्न झाल्या.

यामधील योग स्पर्धांचे महापालिका माध्यमिक शाळा क्र.१०३ ऐरोली येथे तसेच किक बॉक्सिंग स्पर्धेचे वारकरी भवन, सीबीडी येथे आयोजन करण्यात आले. बास्केटबॉल आणि सेपकटकरा स्पर्धा क्राईस्ट ॲकॅडमी कोपरखैरणे येथे आणि व्हॉलीबॉल स्पर्धा नॉर्थ पाँईंट स्कुल, कोपरखैरणे येथे तसेच हॉकी, रोल बॉल, रोलर हॉकी स्पर्धा या फादर ॲग्नल स्कुल, वाशी येथे संपन्न झाल्या.

सानपाडा येथे महापालिकेने विकसित केलेल्या कुस्ती आखाडा मध्ये कुस्ती स्पर्धा आणि शाळा क्रं.९४, कोपरखैरणे येथे वुशू स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. सर्वात जास्त विद्यार्थी खेळाडुंचा सहभाग असलेली सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ॲथलेटिक्स स्पर्धा राजीव गांधी स्टेडीयम, सीबीडी-बेलापूर येथे संपन्न झाली. यामध्ये १२७ शाळांमधून २५००हुन अधिक खेळाडुंनी सहभाग होत आपले क्रीडानैपुण्य प्रदर्शित केले. सर्वच गटांत आणि प्रत्येक क्रीडा प्रकारात उत्तम खेळाचे प्रदर्शन करणारे संघ, खेळाडू मुंबई विभागीय स्तरावरील स्पर्धेकरिता पात्र ठरलेले आहेत.

दरम्यान, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या नियंत्रणाखाली महापालिकेचा क्रीडा विभाग नियोजनबध्दपणे काम करीत आहे. क्रीडा विभागाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे सर्व स्पर्धास्थळी भेट देऊन विद्यार्थी खेळाडूंना शुभेच्छा देत  त्यांचा उत्साह वाढवित आहेत.

क्रीडा शिष्यवृत्ती देणारी नवी मुंबई राज्यातील एकमेव महापालिका...
आगामी काळात खोखो, कबड्डी, कराटे, तायक्वॉन्डो रोलर स्केटींग, सॉपटबॉल, थ्रोबॉल आणि इतर उर्वरित खेळांच्या स्पर्धांचे अशाचप्रकारे नियोजनबध्द पध्दतीने आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धांमुळे महापालिका कार्यक्षेत्रातील शाळांना आणि त्यामधील विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्तरावरील स्पर्धा म्हणून या स्पर्धेत खेळून थेट विभागीय स्तरावर
खेळण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. त्यामुळे या स्पर्धेचे महत्व मोठे आहे. याचा लाभ जास्तीत जास्त शाळांनी घ्यावा आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी खेळाडुंनी यामध्ये सहभागी होत आपल्या सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करुन आपल्या शाळेच्या नावासोबतच नवी मुंबई शहराचे नाव सुध्दा मोठे करावे, असा या स्पर्धा आयोजनामागील उद्देश आहे. या संपूर्ण स्पर्धा आयोजनाद्वारे विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्रीडागुणांना उत्तेजन देण्याचे काम महापालिका करीत असून त्यापुढे जात गुणवंत खेळाडूंना आर्थिक मदत आणि प्रोत्साहन देण्यासाठी विशेष क्रीडा शिष्यवृत्ती देखील दिली जात आहे. अशाप्रकारे क्रीडा शिष्यवृत्ती देणारी नवी मुंबई राज्यातील एकमेव महापालिका आहे. शहरात क्रीडामय वातावरण निर्माण होऊन जागतिक स्तरावर नवी मुंबईचा नावलौकिक वाढविणारे खेळाडू तयार व्हावेत यासाठी आगामी काळात विविध खेळांच्या दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करण्याचे कामही नवी मुंबई महापालिकेने हाती घेण्यात आले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रेल्वे प्रवासी मंडळांच्या भजन स्पर्धा संपन्न