वाशी गांव येथे महाआरोग्य शिबिरात ८०० जणांची तपासणी

नवी मुंबई ः ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून बेलापूर गांव पाठोपाठ १७ डिसेंबर रोजी वाशी गांव येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून जवळपास ८०० नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. नवी मुंबई वेल्फेयर फाऊंडेशन, अपोलो हॉस्पिटल बेलापूर, येही आय सानपाडा क्लिनीक यांच्या  सहकार्याने सदर मोफत शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. महाआरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब, डायबेटीस, बीएमआय, ईसीजी, डोळ्यांची
तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला, मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या तसेच मोफत औषधे, चवनप्राश आणि मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, जिल्हा महामंत्री तथा बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे, प्रभाग अध्यक्ष प्रवीण भगत, ज्येष्ठ समाजसेविका गुणाबाई सुतार, अविनाश भगत, ‘नवी मुंबई वेल्फेयर फाऊंडेशन'चे अध्यक्ष गणेश पाटील, बिलेश भगत, राकेश भोईर, शरद पाटील, उमेश भोईर, मोनीश सुतार, निलेश भोईर, सुधाकर पाटील, संजय भोईर तसेच वाशी गावातील ग्रामस्थ आणि रहिवाशी उपस्थित होते.

वाशी गांव येथे भारतीय जनता पार्टी आणि नवी मुंबई वेल्फेयर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेे. वाशी गावातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळावी, त्यांना मोफत औषधे उपलब्ध व्हावी, असा यामागचा उद्देश होता. शिबीरासाठी ज्येष्ठ समाजसेविका गुणाबाई सुतार, अविनाश भगत, गणेश पाटील, ‘भाजपा युवा मोर्चा'चे वाशी गांव अध्यक्ष प्रवीण भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाआरोग्य शिबीराच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

वाशी गावातील ज्येष्ठ नागरिकांना निवारा शेड, बसण्यासाठी बाकडे, सर्व सुविधांयुक्त प्रसाधनगृह अशा सर्व सुविधांकरिता आमदार निधी उपलब्ध करुन देणार आहे. वाशी गावातील नागरिकांनी योग्य रितीने सहकार्य केल्यास लवकरच वाशी गावाचा विकास करणे सोपे होईल. -आमदार मंदाताई म्हात्रे, बेलापूर.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा महोत्सव'मध्ये ३५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग