अनधिकृतपणे टाकल्या जाणाऱ्या डेब्रीजवर प्रतिबंध महत्वाचे -राजेश नार्वेकर

नवी मुंबई ः शहर स्वच्छतेमधील डेब्रीज एक मोठी समस्या असून त्यावर मार्ग काढण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी बांधकाम आणि पाडकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या प्रकल्पस्थळाला भेट देत तेथील कार्यप्रणालीची सविस्तर पाहणी केली. तसेच सदर प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहील याकडे बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी शहर अभियंता  संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नागरिकांना त्यांचा बांधकाम आणि पाडकाम कचरा महापालिकेकडे पुढील प्रक्रियेसाठी हस्तांतरण करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली असून त्याकरिता ८८९८०१७००९ असा मोबाईल क्रमांक जाहीर केलेला आहे. या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास निश्चित केलेली रक्कम भरुन नागरिकांचा बांधकाम आणि पाडकाम कचरा महापालिकेच्या वतीने संकलीत करण्यात येतो. याशिवाय शहरात खुल्या जागांवर अनधिकृतपणे डेब्रीज टाकले जाऊ नये याकरिता २ डेब्रीज भरारी पथके परिमंडळनिहाय लक्ष ठेवून असतात. तरीही विशेषत्वाने रात्रीच्या वेळी आडबाजुला अनधिकृतपणे रस्त्याच्या कडेला डेब्रीज टाकले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. स्वच्छ शहराचे मानांकन सातत्याने उंचाविणारे शहर म्हणून नवी मुंबईकडे अपेक्षेने पाहिले जात असताना शहर स्वच्छतेला बाधा पोहोचविणाऱ्या अनधिकृतपणे टाकल्या जाणाऱ्या डेब्रीजवर प्रतिबंध आणणे गरजेचे आहे. यादृष्टीने भरारी पथके सक्षम करणे आणि त्यांच्या सोबत शहर सौंदर्याला बाधा पोहोचविणारे डेब्रीज उचलण्यासाठी वाहने उपलब्ध करुन देणे याबाबीची मुल्यात्मक तपासणी करावी, असे निर्देश आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले.

यावेळी प्रकल्पस्थळावरील ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रक्रियेचीही आयुक्तांनी बारकाईने माहिती घ्ोतली. या प्रक्रियेत ओल्या कचऱ्यावर २८ दिवसांमध्ये बायोकल्चर फवारण्यात येऊन विन्ड्रोज तयार केले जातात. त्यानंतर विविध चाळण्यांमधून प्रक्रिया करुन सेंद्रीय खत तयार होते. सदर सेंद्रिय खत गार्डन सिटी अशी ओळख असणाऱ्या नवी मुंबईतील विविध उद्याने फुलविण्यासाठी वापरले जात असून शेतकऱ्यांनाही याची विक्री केली जाते. या खताचे वितरण जास्तीत जास्त लोकांना केले जाईल याकडे लक्ष देण्याचे आयुक्त नार्वेकर यांनी सूचित केले.

प्रकल्पस्थळी असलेल्या वजन काट्यावरील संगणक प्रणालीचीही आयुक्तांनी पाहणी केली. तसेच तेथील लिचेट प्रक्रिया प्रकल्प स्थळाला भेट देऊन तेथील कार्यप्रणालीची आणि स्काडा प्रणालीची माहिती घेतली. प्रकल्पस्थळी येणाऱ्या घनकचऱ्यावर डिओड्रन्टचे स्प्रेईंग करण्यात येते. याठिकाणी कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास होणार नाही अशाप्रकारे स्प्रेईंग करण्याची दक्षता घ्यावीे. दररोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे नागरिकांनी घरातच ओला आणि सुका असे वर्गीकरण करावे याविषयी नागरिकांना प्रबोधन केले जात आहे. असा महापालिकेमार्फत संकलित केलेला वर्गीकृत कचरा वाहतूक करतेवेळी कोणत्याही प्रकारे एकत्रित होणार नाही याची काटेकोर दक्षता घेण्यात यावी, असे आयुवतांनी यावेळी सूचित केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या निवडणूक मतदानासाठी यंत्रणा सज्ज : आज मतदान