वाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी वाहतुक पोलिसांकडुन जनजागृती मोहीम
नवी मुंबई : चार-चाकी वाहने चालवताना वाहतुकीच्या नियमाबरोबरच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सिटबेल्ट लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु अनेक चारचाकी वाहन चालक याकडे दुर्लक्ष करुन नियम धाब्यावर बसवतात त्याचबरोबर आपला जीव सुद्धा धोक्यात घालतात. या पार्श्वभूमीवर पनवेल शहर वाहतूक शाखेच्यावतीने नवीन पनवेल उड्डाणपुलाजवळ सिटबेल्ट जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी नियमांचे पालन न करणा-या वाहनचालकांना गुलाबपुष्प देऊन त्यांना वाहतुक नियमांचे पालन करण्याबाबत सुचना करण्यात आल्या.
चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करत असताना वाहन चालक आणि बाजूच्या सीटवरील प्रवाशाने सीटबेल्ट लावणे आवश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सिटबेल्ट लावणे अत्यंत महत्त्वाचे असतानाही अनेक वाहन चालक या नियमाचे पालन करत नाहीत. त्यामुळे सिटबेल्ट लावून वाहने चालवण्याबाबत परिवहन आणि पोलीस यंत्रणेकडून वारंवार आवाहन केले जाते. सिटबेल्ट न लावणा-या वाहनचालकांवर वाहतूक पोलीस तसेच आरटीओकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यातून मोठÎा प्रमाणात दंडही वसूल केला जातो.
दरम्यान, अनेक वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याने त्यांच्यामध्ये वाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी वाहतुक पोलिसांकडुन जनजागृती मोहीम राबविण्यात येते. याच पार्श्वभुमीवर पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांच्या मार्गदर्शनानुसार मंगळवारी सिटबेल्ट संदर्भात विशेष अभियान राबविण्यात आले. यावेळी नियमांचे पालन न करणाऱया वाहनचालकांना गुलाबपुष्प देऊन त्यांना वाहतुक नियमांचे पालन करण्याबाबत सुचना करण्यात आल्या. त्याचप्रमाणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहन चालकांवर कारवाई देखील करण्यात आली.