मोरबे धरण प्रकल्पाची आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून पाहणी

नवी मुंबई ः प्रतिदिन ४५० द.ल.लि. क्षमतेच्या स्वतःच्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पामुळे नवी मुंबईची जलसमृध्द शहर अशीही ओळख आहे. पातळगंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी नदीवर मोरबे धरण प्रकल्प उभा असून तेथून भोकरपाडा येथील जलशुध्दीकरण केंद्र प्रकल्पाठिकाणी पाणी आणून त्याठिकाणी शुध्दीकरण होऊन नवी मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो.

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या मोरबे धरण प्रकल्पस्थळी भेट देत प्रकल्पाची आणि परिसराची पाहणी केली. तसेच भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्रालाही भेट देऊन तेथील कार्यरत यंत्रणेची पाहणी केली. याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे तसेच संबंधित अधिकारी आणि अभियंता उपस्थित होते.

मोरबे धरण प्रकल्पाची पाहणी करताना आयुक्त राजेश नार्वेकर यांनी धरण परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने बाहेरील व्यक्तींना योग्य परवानगी शिवाय मज्जाव करावा. परिसरातील वृक्ष लागवड आणि संवर्धनाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे, अशा सूचना केल्या. धरण प्रकल्पग्रस्तांची ७ गावे आणि ८ वाड्या यांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नवी मुंबई महापालिकेची असून त्याकडेही विशेष लक्ष देण्यात यावे. धरण क्षेत्रात अतिक्रमण होऊ नये याची काळजी घ्यावी. तसेच धरण परिसराचे सुशोभिकरण करण्यात यावे. महत्वाचे म्हणजे धरण पाणलोट क्षेत्रात आगामी उन्हाळी कालावधीत वाळू उपसा होणार नाही याकडेही बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले.

यानंतर भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्राला भेट देऊन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी तेथील यंत्रसामुग्रीची आणि जलशुध्दीकरणाची कार्यपध्दती जाणून घ्ोतली. तसेच जलवितरणाच्या पध्दतीची माहितीही घ्ोतली. जलशुध्दीकरणाच्या बांधकामाचे आयुर्मान वाढविण्यासाठी आवश्यक दुरुस्त्या करुन घ्ोण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करण्याचे निर्देशित करतानाच तेथील विद्युत वापरावर नियंत्रण आणणे आणि अपारंपारिक ऊर्जेला प्राधान्य देण्याचे आयुक्त नार्वेकर यांनी सूचित केले.

दरम्यानम, जलवितरण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणारी अत्याधुनिक स्काडा प्रणाली काळानुरुप अद्ययावत असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आवश्यक बदल करण्याची कार्यवाही प्रस्तावित करावी. जलवितरण पध्दती अधिक प्रभावी होण्याच्या दृष्टीने कार्यप्रणाली अंमलात आणावी, असे आयुवत राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शिवाजीराव पाटील उद्यानात सायंकाळच्या वेळेस दिवे बंद स्थितीत