नवी मुंबई महापालिका ज्येष्ठ नागरिकांना देत असलेल्या सुविधांबद्दल कौतुकोद्‌गार

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका, राज्य सरकार राबवीत असलेल्या विविध उपक्रमांत ज्येष्ठ नागरिक संघ, नेरुळ या संस्थेमधील ज्येष्ठांचा सक्रिय सहभाग असल्याचा आपल्याला आदर वाटत असून या ज्येष्ठांच्या विविधांगी अनुभवाचा महापालिकेसाठी कसा यथायोग्य उपयोग करुन घेता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रुमुख पाहुणे म्हणून बोलताना सांगितले. ज्येष्ठ नागरिक संघ, नेरुळ या संस्थेच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागिरक भवन येथे १२ डिसेंबर रोजी पार पडलेल्या ३१ व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी विचारमंचावर मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ.पां. देशपांडे, आईस्कॉन, फेस्कॉमचे उपाध्यक्ष अप्पासाहेब टेकाळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर, सचिव दीपक दिघे, खजिनदार विकास साठे उपस्थित होते.

संघाने उभारलेली सुंदर इमारतीची वास्तू व तेथे नियमितपणे चालवलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांचे कौतुक करुन आयुवत नार्वेकर पुढे म्हणाले की नवी मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिकाधिक विरंगुळा केंद्र उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न राहिल. आपण आयुष्यभर करत असलेले, आवडीचे काम निवृत्तीनंतर थांबवू नका. तरुणांना प्रोत्साहन द्या. आपले अनुभव शब्दबध्द करा. कारण अलिकडे आत्मचरित्रे वाचणाऱ्यांची संख्या वाढत असून आपले रुट्‌स शोधत परदेशस्थ भारतीयांची तरुण मुले भारतात येत असतात, त्यांना अनेकदा योग्य ती माहिती मिळत नाही, त्यांना हे लिखाण उपयोगी पडेल असा सल्ला अ. पां. देशपांडे यांनी आपल्या भाषणातून यावेळी दिला. देशाला दिशा देणारा ज्येष्ठ नागरिक संघ असल्याचे सांगत नवी मुंबई महापालिका ज्येष्ठ नागरिकांना देत असलेल्या सुविधांबद्दल अप्पासाहेब टेकाळे यांनी कौतुकोद्‌गार काढले. संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर यांनी प्रास्ताविकातून ज्येष्ठ नागरिक संघ राबवीत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेले ज्येष्ठ नागरिक तसेच वैवाहिक जीवनाची पन्नाशी गाठलेल्या जोडप्यांचा तसेच कार्यक्रमास उपस्थित विशेष निमंत्रितांचा सत्कार आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचित्रा कुंचमवार आणि विकास साठे यांनी केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मोरबे धरण प्रकल्पाची आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून पाहणी