‘स्वाभिमानी शेतकरी संघटना'चे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी एपीएमसी मार्केट'ला सदिच्छा भेट देत पाहणी दौरा

वाशी ः माजी खासदार तथा ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना'चे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) भाजी मार्केट मधील व्यापारी आणि या ठिकाणी शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांची माहिती घ्ोतली. राजू शेट्टी एका खाजगी कार्यक्रमासाठी १० डिसेंबर रोजी नवी मुंबई मध्ये आले असता त्यांनी ‘एपीएमसी मार्केट'ला सदिच्छा भेट देत मार्केटचा पाहणी दौरा केला.

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती आहे. मात्र, मोठी बाजार समिती असून, देखील बाजार समिती आवारातील घटकांना सेवा सुविधा देण्यात बाजार समिती आजही पिछाडीवर आहे. एपीएमसी बाजार आवारात रोज हजारो वाहन चालक, शेतकरी शेतमाल घ्ोऊन येतात. मात्र, एपीएमसी बाजार आवारात मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या वाहनांना आज पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे एपीएमसी बाजार आवाराच्या बाहेर उभ्या राहणाऱ्या वाहनांना वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. एपीएमसी बाजार आवाराच्या बाहेर उभ्या वाहनांमधून शेतमाल चोरीला जाणे, एपीएमसी बाजार आवारात स्वच्छतेचा अभाव तसेच शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे वेळेवर न मिळणे आदी समस्यांचा पाढा एपीएमसी बाजार आवारातील व्यापारी आणि शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांच्या समोर वाचला. त्यानंतर एपीएमसी बाजार आवारातील घटकांच्या समस्या बाजार समिती प्रशासन तसेच शासन दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन यावेळी राजू शेट्टी यांनी व्यापारी आणि शेतकऱ्यांना दिले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बेलापूर मध्ये मेरीटाईम बोर्ड तर्फे पहिल्यांदा पलेमिंगो बोट सुरु