विक्रेते व नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे थांबवून कागदी व कापडी पिशव्या वापराचे आवाहन

नवी मुंबई : स्वच्छताविषयक कामांच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार क्षेत्रीय स्तरावर कार्यवाही अधिक जोमाने करण्यात येत आहे. पहिल्या नंबरच्या स्वच्छ शहराचे मानांकन साध्य करण्यासाठी आठही विभाग कार्यालय क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छताविषयक नानाविध उपक्रम राबविले जात आहेत.

      त्यानुसार दत्तजयंती उत्सवानिमित्त सानपाडा येथील दत्तमंदिरात भाविकांची होणारी गर्दी व त्या अनुषंगाने विविध साहित्याच्या विक्रेत्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे यांनी आपल्या सहका-यांसह तेथे विक्रेत्यांशी व नागरिकांशी संवाद साधला व त्यांना सिंगल यूज प्लास्टिक प्रतिबंधाची गरज लक्षात आणून दिली. अशाच प्रकारे सेक्टर 15, कोपरखैरणे येथील मार्केट परिसरातही त्यांनी विक्रेते व नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे थांबविण्याचे व त्याऐवजी कागदी व कापडी पिशव्या वापराचे आवाहन केले, तसेच या नियमाचे उल्लंघन केल्यास दंड व शिक्षेच्या तरतूदीचीही जाणीव करून दिली.

      बेलापूर विभागात करावे तलाव आणि खाडी परिसरात एनव्हराेंमेंट लाईफ या संस्थेच्या सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संस्थेचे प्रमुख श्री. धर्मेंद्र बराई यांनी आपल्या सहका-यांसह यामध्ये सहभागी होत स्वच्छता निरीक्षक श्री. विजय नाईक आणि त्यांच्या सहका-यांसह त्या परिसरातील प्लास्टिकसह इतर कचरा संकलन केले. यामध्ये नेरूळच्या तेरणा इंजिनिअरींग कॉलेजचे एनएसएस विद्यार्थी आणि एसआयईएस महाविद्यालयाची माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी उत्साहाने सहभागी झाले होते.

      वाशी, सेक्टर 9 येथील भाजी मार्केटमध्ये व्यापारी व नागरिकांमध्ये प्लास्टिक प्रतिबंधाविषयी जनजागृती करण्यात आली. व्यापा-यांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करू नये याविषयी समज देण्यात आली तसेच 200 हून अधिक कापडी पिशव्यांचे मोफत वितरण करण्यात आले.

      कच-याचे निर्मितीच्याच ठिकाणी वर्गीकरण हा घनकचरा व्यवस्थापनातील अत्यंत महत्वाचा भाग असून याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी बैठकीत निर्देशित केले होते. त्यादृष्टीने विभागीय पातळीवर स्वच्छता अधिकारी व त्यांचे सहकारी यांची पथके तयार करण्यात आली असून नागरिकांनी घरातून कचरा देताना ओला, सुका व घरगुती घातक असा वेगवेगळाच द्यावा याविषयी सोसायट्या, वसाहती यामध्ये जाऊन व्यापक जनजागृती केली जात आहे.

      अशा प्रकारच्या स्वच्छता शिबीराचे सेक्टर 20, ऐरोली येथील ध्रुवतारा सोसायटीमध्ये आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी ६८ सदनिका असून त्या सदस्यांना कच-याचे घरातच 3 प्रकारे वर्गीकरण करणे व तो देताना वेगवेगळा देणे, खत टोपली वापरून ओल्या कच-याची घरातच विल्हेवाट लावणे, सोसायटीमध्ये कम्पोस्ट पीट्‌स तयार करून विल्हेवाट लावणे याशिवाय थ्री आर चे महत्व आणि प्लास्टिक प्रतिबंध याविषयी तेथील रहिवाशांना माहिती देत जनजागृती करण्यात आली. अशाच प्रकारचे जनजागृती शिबीर 109 सदनिका असलेल्या वाशी सेक्टर 1७ येथील मोठ्या  आशियाना सोसायटीमध्येही राबविण्यात आले.

      स्वच्छतेमध्ये नवी मुंबईच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीत नागरिकांच्या सहभागाचा सर्वात महत्वाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे प्रामुख्याने लोकसहभागावर भर देत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये पहिल्या नंबरचा निश्चय करीत अधिक कृतीशील झाली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ऑनलाइन प्रणालीमुळे नियोजन प्राधिकरणांच्या उत्पन्नात घट