सैनिकांच्या कुटूंबाप्रती कृतज्ञता असली पाहिजे - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे -  सैन्यदलातील शौर्य, देशासाठी बलिदान देण्याची सैनिकांची तयारी, त्यांची यशोगाथा आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे स्पर्श करून जाते. त्यांच्याप्रती कृतज्ञता असली पाहिजे, ही भावना वाढीला लागली पाहिजे. त्यांच्या कुटूंबाप्रती असलेली जबाबदारी पूर्णत्वात पार पाडली पाहिजे, अशी भावना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी व्यक्त केली.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे ‘सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2022 संकलन शुभारंभ” कार्यक्रमात शिनगारे बोलत होते. यावेळी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2021 संकलनात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर प्रांजल जाधव, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, आदी यावेळी उपस्थित होते.  

शासनाला दिलेले उद्दिष्ट जिल्ह्याने पूर्ण केले आहे. यात सकारत्मकतेने आपण सर्वजण सहभागी झालो आहोत. मागील वर्षाचे उद्दिष्ट सहजतेने पूर्ण केले असून चालू वर्षाचे उद्दिष्टही निश्चित पूर्ण करणार आहोत, असेही शिनगारे यांनी यावेळी सांगितले. 

या कार्यक्रमाच्या सुरूवातीला शूरविरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित मान्यवरांना ध्वज लावून ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. सशस्त्र सेना ध्वजदिन -2021 निधी संकलनाचे उत्कृष्ट कार्य केलेल्या संस्था, कार्यालये यांचा प्रशस्तिपत्र, सनद व भेटवस्तू देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तहसीलदार युवराज बांगर, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्यासह विविध विभागाच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. 

तसेच लाभार्थी माजी सैनिकांना कल्याणकारी निधीचे धनादेश वितरीत करण्यात आले. यावेळी इयत्ता दहावीत उत्कृष्ट गुण मिळविलेल्या सैनिकांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना धनादेशाद्वारे सहाय्य करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजल जाधव यांनी केले. तर जिल्हा सैनिक कार्यालयाचे सहायक सुभाष डोंगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विक्रेते व नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे थांबवून कागदी व कापडी पिशव्या वापराचे आवाहन