डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋण न फिटणारे -डॉ.भालचंद्र मुणगेकर

नवी मुंबई ः स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चार तत्वांवर आधारित आधुनिक भारत उभा करण्याची संकल्पना बाबासाहेबांच्या नजरेसमोर होती. त्यातूनच राज्यघटना आकारास आली. बाबासाहेबांचे ते ऋण आपण आजन्म मानले पाहिजेत आणि त्यांच्या विचारांचा आदर्श कायम नजरेसमोर ठेवून प्रवास केला पाहिजे. त्यातूनच एकात्म विचारांचा आधुनिक भारत उभा राहील, असा विश्वास ज्येष्ठ अर्थतज्ञ, विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महापालिका आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आधुनिक भारताची संकल्पना' या विषयावर डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात श्रोत्यांशी संवाद साधला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशाला पडलेले सुंदर स्वप्न असून परदेशातील कोलंबिया विद्यापीठाने त्यांच्या ४५० वर्षाच्या इतिहासातील सर्वात विद्वान विद्यार्थी, असा बाबासाहेबांचा गौरव केलेला आहे. प्रचंड अभ्यासू आणि विचारवंत असणारा व्यक्ती प्रत्यक्ष असू शकतो यावर विश्वास बसू नये इतके बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व अलौकिक होते, अशा शब्दात डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी बाबासाहेबांच्या व्यक्तित्वाचा गौरव केला.
स्वातंत्र्य बाबासाहेबांची मुलभूत प्रेरणा होती. त्यांना जगण्याचे स्वातंत्र्य अपेक्षित होते. स्वातंत्र्य चराचरातील प्रत्येक प्राण्याची गरज असून ती वैश्विक संकल्पना आहे. समतेशिवाय स्वातंत्र्याला अर्थ नाही असा बाबासाहेबांचा विचार डॉ. मुणगेकर यांनी दैनंदिन जीवनातील अनेक साधीसोपी उदाहरणे सांगत सुस्पष्ट केला.

दुसऱ्यांच्या डोळ्यांनी पाहण्याची सवय म्हणजे बंधुता इतकी सोपी व्याख्या सांगत बंधुता बाबासाहेबांच्या जिव्हाळ्याचा विषय होता ते देखील त्यांनी सोपे करुन सांगितले. अनेक हालअपेष्टा, अवहेलना, अपमान सहन करूनही कोणतीही कटुता न बाळगता समाजातील सर्व घटकांना न्याय देत समानता प्रस्थापित करणारी घटना आपल्याला देणाऱ्या बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत, असेही डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितले.

दुसऱ्याचा हक्क नाकारणे, दुसऱ्याचे हिरावून घेणे म्हणजे अन्याय असल्याचे सांगत न्याय जगण्याचे साधन आहे अशी बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली भूमिका डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी यावेळी मांडली. घटनेतून देशाचे भविष्य घडविण्याची संधी आपल्याला लाभली आहे. जगातील प्रत्येक देशाच्या विधिमंडळात भारताच्या राज्यघटनेची प्रत ठेवलेली आहे. तो आपला अभिमान असल्याचेही डॉ. मुणगेकर यांनी स्पष्ट केले.
तर महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ज्ञान हीच शक्ती या बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारसंपदेवर आधारित उभारलेल्या या स्मारकाची ओळख ज्ञानस्मारक व्हावी अशी महापालिकेची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. त्यादृष्टीने येथील ग्रंथालय समृध्द करण्याकडे आणि तेथे ऑडिओ व्हिज्युअल साधनांव्दारे ई-लायब्ररी अधिक विकसित करुन नव्या पिढीला बाबासाहेबांच्या विचारांकडे घेऊन जाण्याचे काम केले जात असल्याचे सांगितले.

सदर व्याख्यान प्रसंगी नुकताच महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुमर्ू यांच्या शुभहस्ते साहसी जलतरण क्षेत्रातील मानाचा तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार प्राप्त नवी मुंबईचा साहसी जलतरणपट्टू तसेच ‘स्वच्छ नवी मुंबई मिशन'चा स्वच्छता प्रसारक युथ आयकॉन शुभम वनमाळी याचा विशेष सन्मान करण्यात आला.

त्याचप्रमाणे पुस्तकविक्रीचे नवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या ‘गोष्ट पैशापाण्याची' या पुस्तकाचे लेखक आणि ‘लेटस्‌ रीड इंडिया' संस्थेच्या माध्यमातून व्यापक वाचक चळवळ राबविणारे संस्थाप्रमुख प्रफुल्ल वानखेडे याना विक्रमी ग्रंथरचनेबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले.
माजी महापालिका आयुक्त तथा विद्यमान ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर देखील व्याख्यान श्रवणासाठी उपस्थित होते. त्यांच्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत नाविन्यपूर्ण रितीने साकारलेल्या या स्मारकाची वर्षपूर्ती होत असताना त्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक वही एक पेन उपक्रमांतर्गत गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप