एपीएमसी मध्ये ‘फरसाण स्टॉल'ला आग

वाशी ः वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) धान्य बाजार आवारात ५ डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका ‘फरसाण स्टॉल'ला आग लागण्याची घटना घडली आहे. सदर आगीवेळी स्टॉल बंद असल्याने सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी किंवा कोणी जखमी झाले नाही. मात्र, या आगीत स्टॉल सर्व मधील साहित्य जळून खाक झाले असून, या आगीमुळे बाजार समिती आवारातील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ‘एपीएमसी बाजारपेठ'ची ओळख आहे. परंतु, मोठी बाजारपेठ असूनही अग्निसुरक्षेच्या बाबतीत मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती आजही पिछाडीवर आहे. दोन आठवड्यापूर्वी एपीएमसी फळ बाजारात भीषण आग लागून २० ते २५ गाळे जळाले होते. त्यानंतर एपीएमसी प्रशासनाने बाजार आवारातील गाळे धारकांना अग्निरोधक यंत्र बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, एपीएमसी फळ बाजारात आग लागून दोन आठवडे उलटत नाही तोवर एपीएमसी धान्य बाजारात आगीची घटना घडली आहे. एपीएमसी धान्य बाजारातील ए विंग शेजारील एका ‘फरसाण स्टॉल'ला ५ डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. सदर आगीची घटना समजताच वाशी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सदर आग शॉर्ट सर्कटिमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज असून, आगीवेळी स्टॉल बंद असल्याने सुदैवाने या आगीत कुठलीही जीवित हानी किंवा कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती ‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती'चे सुरक्षा अधिकारी बी. वाय. पाटील यांनी दिली. 

 

--

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी