‘खारघर दारुमुक्त'साठी सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्र

खारघर ः खारघर शहर दारुमुक्त असावे, अशी खारघर मधील रहिवाशांची मागणी आहे. त्यामुळे दारुमुक्त शहर विषयी नियमावलीची माहिती घेवून खारघर शहर दारुमुक्त असावे, यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभुराज देसाई यांची सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसोबत लवकरच भेट घेण्यात येईल, असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी संघर्ष समिती आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना दिले.

खारघर शहर दारुमुक्त करण्यासाठी खारघर मधील रहिवाशी गेल्या पंधरा वर्षांपासून लढा देत आहेत. खारघर मध्ये सुरु झालेले श्याम वाईन दुकान खारघर मधील नागरिकांच्या एकजुटीमुळे शासनास बंद करावे लागले. खारघर मधील नागरिक दारु दुकानांच्या विरोधात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महिनाभरापूर्वी खारघर सेक्टर-१० मध्ये निरसुख पॅलेस या बारला परवानगी देण्यात आली. खारघर मधील निरसुख पॅलेस बार तसेच पूर्वी पासून सुरु असलेला आजीत पॅलेस बंद करण्यासाठी यासाठी खारघर मधील नागरिकांनी गेल्या २७ नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या ‘खारघर बंद'ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दरम्यान, पनवेल महापालिका प्रशासनाने महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी ‘खारघर ग्रामपंचायत'ने खारघर दारु बंदच्या ठरावाच्या धर्तीवर पुन्हा पूर्वाश्रमीचे खारघर मध्ये दारु विक्री बंद ठराव करुन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविला आहे. मात्र, खारघर मधील नागरिकांनी खारघर दारुमुक्त करण्यासाठी सुरु केलेला लढा पुढे कायम सुरु राहावा, यासाठी पुढील नियोजनाच्या तयारीत असताना सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी ४ डिसेंबर रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेवून निवेदन दिले.

२००७ मध्ये खारघर मध्ये सुरु झालेले दारुचे दुकान शासनाने बंद केले तेच धोरण कायम असायला  आहे. दारुमुक्त खारघर शहर असावे, अशी खारघर मधील नागरिकांची मागणी असून आपण खारघर वासीयांसोबत आहे, असे यावेळी आ. प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केले.
दारुबंदी शहर विषयी शासनाचे धोरण, नियमावली काय आहे, याविषयी संपूर्ण माहिती घेवून ६ डिसेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभुराज देसाई यांची वेळ मिळाल्यास संघर्ष समिती तसेच सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसोबत भेट घेण्यात येईल, असे आश्वासनही आ. प्रशांत ठाकूर यांनी दिले.

याप्रसंगी विजय पाटील, केसरीनाथ पाटील, कीर्ती मेहरा, बिना गोगरी, राजश्री कदम, संध्या शारबिद्रे, ब्रिजेश पटेल, रमेश मेनन, बळीराम नेटके, अक्षय नाईक, विश्वनाथ चौधरी, मनोज शरबिद्रे आदी उपस्थित होते.

खारघर शहर दारुमुक्त असावे यासाठी पनवेल महापालिका प्रशासनाचे ध्येय धोरण काय आहे, दारु बंद विषयी मतदान तसेच महापालिकेच्या प्रभाग विभागाची सीमारेषा या विषयी सखोल चर्चा करुन खारघर दारुमुक्त करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. - आमदार प्रशांत ठाकूर

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी मध्ये ‘फरसाण स्टॉल'ला आग