‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' अभियानचा शुभारंभ

ठाणे ः  ठाणे शहराच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून स्वच्छ आणि सुंदर ठाणे साकारण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी ‘माझे ठाणे' अशी भावना मनात ठेवून ‘ठाणे'च्या विकासासाठी उत्कृष्ट दर्जाचे काम करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

ठाणे महापालिकेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, आदि उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच ठाणे महापालिकेचा विशेष उपक्रम ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. आजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. विकासाचा शुभारंभ मुख्यमंत्री म्हणून आनंदाचा दिवस आहे. मला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्याची आणि राज्याची सेवा करण्याची संधी ठाणेकरांनीच दिली आहे. ठाणेकरांनी ‘ठाणे'च्या विकासात पुढे येऊन योगदान देणे आवश्यक आहे. या ‘ठाणे'वर बाळासाहेबांनी विशेष प्रेम केले आहे. बाळासाहेबांच्या काळातीलदादोजी कोंडदेव स्टेडीयम कात टाकतेय. स्टेडीयमच्या नुतनीकरणाचे काम हाती घण्यात आले आहे.  वाड्यापाड्याचे टुमदार जुने ठाणे विकसित होत आहे. ‘ठाणे'मध्ये भविष्याच्या दृष्टीने नवनवीन बदल होत आहेत. यामुळे ठाणेकरांना आधुनिक सेवासुविधा मिळत आहेत. ‘ठाणे'चा सर्वांगिण विकास साधण्यासाठी  नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मुंबईच्या जडणघडणीतसुद्धा ‘ठाणे'चे वेगळे योगदान आहे. कोव्हीड काळात ‘ठाणे'तील डॉक्टर, नर्स मुंबईत सेवा देत होते. राज्याचे, देशाचे वैभव असलेल्या मुंबईला साथ देणारे ठाणे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, यासाठी सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. ठाणेे शहर स्वच्छ, सुंदर, निरोगी,
हिरवेगार असले पाहिजे. त्यासाठी काय केले पाहिजे यावर विचार व्हावा. सार्वजनिक जागा, मंडई, मच्छी मार्केट,  बागा कायमस्वरुपी स्वच्छ करुन त्यांचे सुशोभीकरण करावे. शहरातील रस्ते, उड्डाणपुल यांत्रिकीकरणाद्वारे स्वच्छ झाले पाहिजे. शहराचे प्रवेशद्वार, भितीचित्रे, रस्ते दुभाजकांच्या रंगरंगोटीचे काम सुरु आहे. चांगल्या रस्त्यांवर लेन माकर्िंग, उड्डाणपुलाचे सौंदर्यीकरण व्हायला हवे. लोकांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे. पुढील चार महिन्यात शंभर टक्के रस्ते सिमेंट कॉक्रिटचे होतील. एकूण १४२ कि.मी.च्या रस्त्यांचे काम ६ महिन्यात करावे. सेवा रस्ते वापरात आणून मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल याची काळजी घ्यावी, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सूचित केले. यावेळी महापालिका आयुवत अभिजी बांगर यांनी मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियान आणि महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पना आणि ध्येयानुसार विकास कामे सुरू आहेत. ठाणे सुंदर आणि स्वच्छ दिसावे, वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी महापालिका काम करत असल्याचे आयुवत बांगर यांनी स्पष्ट केले.

ठाणे शहराच्या स्वच्छते सोबत स्वच्छता करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपुलकीची भावना व्यक्ती केली. शहराच्या स्वच्छतेतील महत्त्वाचे योगदान असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याबरोबर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी महापालिकेमार्फत करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. जनतेचा निधी जनतेसाठी आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा पुरवण्यासाठी वापरण्यात यावा. ठाणे शहराच्या विकासासाठी ६०५  कोटींचा निधी दिला आहे. राज्य सरकार आणि महापालिका निधी देईल. मात्र, अधिकाऱ्यांनी दर्जात्मक कामे करावे. विकास कामांना गती देण्याची क्षमता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात आहे. अधिकाऱ्यांनी त्या क्षमतेचा वापर करुन विकास कामांना गती द्यावी. -ना.एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री-महाराष्ट्र राज्य.

आयुक्त बांगर यांचे विशेष कौतुक...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या कामाबद्दल विशेष कौतुक केले. आयुक्त बांगर यांचे नवी मुंबईतील काम प्रशंसनीय आहे. ज्याप्रमाणे त्यांनी नवी मुंबई शहराला स्वच्छ आणि सुंदर शहर अशी ओळख निर्माण करुन दिली. हीच अपेक्षा ‘ठाणे'बद्दल आहे. बांगर यांच्या कार्यकाळात ठाणे शहराचाही कायापालट होऊन एक स्वच्छ आणि सुंदर ठाणे पहायला मिळेल.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महावितरण भांडुप परिमंडल मुख्य अभियंतापदी सुनील काकडे