नवीन वर्षात दिघा रेल्वे स्थानक होणार सुरु

ठाणे ः ठाणे मार्गे नवी मुंबईत प्रवास करणाऱ्या मुंबई तसेच कळवा, कल्याण-डोंबिवली, बदलापूर याठिकाणच्या रेल्वे प्रवाशांना  रेल्वे प्रशासन आनंदाची बातमी देणार आहे. कळवा-ऐरोली एलिव्हेटेड रेल्वे प्रकल्पातील दिघा स्थानकाचे काम पूर्णत्वास आलेले आहे. येत्या ३१ डिसेंबर पर्यंत दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण करुन देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे, अशी माहिती ‘ठाणे'चे खासदार राजन विचारे यांनी दिली.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली तसेच मिरा-भाईंदर मधील रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांसदर्भात खा. राजन विचारे यांनी ‘मध्य रेल्वे'चे मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश कुमार गोयल यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. याप्रसंगी रेल्वे प्रशासन आणि संबंधित महापालिकांचे अधिकारी उपस्थित होते.  यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान खासदार राजन विचारे यांनी नवीन वर्षात दिघा रेल्वे स्थानक सुरु करण्याची मागणी केली. त्यावेळी मुख्य रेल्वे प्रबंधक गोयल यांनी ३१ डिसेंबर पर्यंत अथवा नवीन वर्षात दिघा रेल्वे स्थानक सुरु करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आल्याचे सांगितले. तसेच नवी मुंबईत रेल्वे स्थानकांमध्ये रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी ‘सिडको'ने विकसित केलेल्या सर्व रेल्वे स्थानकांवर सरकते जिने बसविण्यासाठी सिडको मार्फत निविदा प्रक्रिया सुरु आहे. लवकरच या सर्व रेल्वे स्थानकात सरकते जिने आणि लिपट देखील बसविण्याचे काम सुरु होणार असल्याबाबत मुख्य प्रबंधक गोयल यांनी भाष्य केल्याचे खासदार विचारे म्हणाले.
खा. विचारे यांनी ‘मध्य रेल्वे'चे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांचीही भेट घेऊन सदर समस्या त्यांच्याही निदर्शनास आणून दिल्या.  ‘मध्य रेल्वे'चे मुख्य प्रबंधक रजनीश कुमार गोयल यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये खा. राजन विचारे यांनी मध्य रेल्वे मार्गावरील ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांचा वाढणारा अतिरिक्त भार आणि रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. ठाणे रेल्वे स्थानक मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई नंतर रेल्वे प्रशासनाला जास्त उत्पन्न मिळवून देणारे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकातून दररोज ६ ते ८ लाख प्रवासी ये-जा करीत आहेत. नवी मुंबई मध्ये जाणारे प्रवासी सुध्दा ठाणे रेल्वे स्थानकात उतरुन ट्रान्स हार्बर मार्गे रेल्वेने प्रवास करीत आहेत. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची वाढणारी संख्या लक्षात घ्ोता ठाणे-मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानक आणि ऐरोली-कळवा एलिव्हेटेड प्रकल्पाची नितांत गरज असल्याचे खा. राजन विचारे यांनी सांगितले. त्यादर सदर दोन्ही प्रकल्प जलद गतीने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला आदेश दिल्याचे गोयल यांनी सांगितले.

ठाणे रेल्वे स्थानकावर ६ ते ८ लाख प्रवाशांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून आरपीएफ सुरक्षारक्षक मनुष्यबळ ७० असल्याने सुरक्षारक्षक वाढविण्यात यावे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीची संख्या वाढविण्यात यावी. त्याचबरोबर प्रवाशांना सोयीस्कर
पडेल या दृृष्टिकोनातून तक्रार निवारण केंद्र उभे करावे. जेणेकरुन रेल्वे स्थानकात होणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसू शकेल. ठाणे रेल्वे
स्टेशन येथे सुरु असलेले कल्याण आणि मुंबई दिशेने पादचारी पुलाचे काम युध्दपातळीवर पूर्ण करणे.  रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी २४ तास प्लॅटफॉर्म आणि पादचारी पुलावर आरपीएफची सुरक्षा असणे. रेल्वे स्थानकात तिकीट खिडकी वरती पिकअवर्स मध्ये असणाऱ्या स्टाफची संख्या वाढविण्यात यावी किंवा रेल्वे प्रशासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे युटीएस प्रणाली मार्फत तिकीट काढून घेण्याची सुविधा सुरू केली आहे. त्याबाबत एजन्सी मार्फत ठिकठिकाणी जनजागृती कक्ष उभारुन प्रवाशांना मोबाईल द्वारे तिकीट कसे काढता येईल यांचे मार्गदर्शन करावे. ठाणे रेल्वे स्थानकात असणाऱ्या भारतातील पहिल्या वातानुकुलित शौचालयाची असुविधा, वारंवार बंद होणाऱ्या लिपट याबाबत खा. विचारे यांनी मुख्य प्रबंधक रजनीश कुमार गोयल यांच्याशी चर्चा केली.

तसेच कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे दर एक्सप्रेस रेल्वे गाड्यांच्या दराप्रमाणे लागू केल्यामुळे मेमू रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाढीव तिकीटाचा नाहक भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने रेल्वे तिकीट दर कमी करावेत. बनारस, जौनपूर, आजमगढ येथे
जाण्यासाठी १२१६७/१२१६८ एलटीटी-बनारस एक्स्प्रेसला ठाणे स्थानकात थांबा देण्यात यावा. मुंबई आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करतानाच या लोकलला एसीचे २ किंवा ३ डब्बे जोडण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी यावेळी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

मुख्य रेल्वे प्रबंधक गोयल यांनी ३१ डिसेंबर पर्यंत दिघा रेल्वे स्थानक सुरु करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आल्याचे सांगितले.
नवी मुंबईत रेल्वे स्थानकांमध्ये रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी ‘सिडको'ने विकसित केलेल्या सर्व रेल्वे स्थानकांवर सरकते जिने बसविण्यासाठी सिडको मार्फत निविदा प्रक्रिया सुरु आहे. लवकरच या सर्व रेल्वे स्थानकात सरकते जिने आणि लिपट देखील बसविण्याचे काम सुरु होणार आहे. - राजन विचारे, खासदार-ठाणे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' अभियानचा शुभारंभ