नवी मुंबईतील ३७ हजार नोंदीत रिक्षांपैकी केवळ १२ हजार रिक्षांचे मीटर रिकलीब्रेशन पूर्ण

वाशी ः १ ऑक्टोंबर २०२२ पासून रिक्षा आणि टॅक्सी यांची भाडेदरवाढ लागू झाल्यानंतर सर्व रिक्षा चालकांनी सुधारित दर निश्चित करण्यासाठी भाडे मीटर रिकॅलीब्रेशन करणे क्रमप्राप्त होते. मात्र, नवी मुंबई शहरातील ३७ हजार नोंदीत रिक्षांपैकी केवळ १२ हजार रिक्षांचे मीटर रिकलीब्रेशन पूर्ण झाले आहे. त्यामुळे  या रिक्षा चालकांना परिवहन विभागामार्फत मीटर रिकॅलीब्रेशन करण्यासाठी १५ जानेवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

१ ऑक्टोबर २०२२ पासून मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रातील सर्व शहरात टॅक्सी आणि रिक्षा प्रवासासाठी परिवहन कार्यालयाकडून नवीन भाडेदर लागू करण्यात आले आहेत.  त्यानुसार पहिल्या टप्याच्या प्रवासासाठी २१ ऐवजी आत्ता २३ रुपये मोजावे लागत असून, १ ऑक्टोबर पासून रिक्षांचे मीटर कॅलीब्रेशन करण्याची सुरुवात करण्यात आली आहे . मात्र, नवी मुंबई शहरात निम्म्याहून अधिक रिक्षांचे मीटर रिकॅलीब्रेशन करण्यात आलेले नाही. आत्तापर्यंत ३७ हजारांपैकी केवळ १२ हजार  रिक्षा मीटरचे रिकॅलिब्रेशन झालेले आहे. नवी मुंबई शहरात ३७ हजारांहून अधिक रिक्षा आहेत. नवी मुंबई मध्ये मीटर आणि सीट प्रमाणे रिक्षा चालवल्या जातात. सीट वर प्रवास करणाऱ्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह मीटर नुसार रिक्षा प्रवास करणाऱ्यांची प्रवाशांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे आता मीटर नुसार प्रवास करणाऱ्या रिक्षा प्रवाशांना आता २१ ऐवजी २३ रुपये द्यावे लागत आहेत. यासाठी रिक्षा मीटरचे रिडींग बदलण्याचे काम  १ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आले आहे. मीटर रिकॅलीब्रेशन कोणत्याही विभागात मुक्त धोरणाअंतर्गत केले जाऊ शकते. परंतु, अजूनही निम्म्याहून अधिक रिक्षाचालकांकडून मीटर रिकॅलीब्रेशन करुन घेण्यात आलेले नाही. टॅक्सी, ऑटोरिक्षा भाडेमीटरचे रिकॅलीब्रेशन करण्यासाठी परिवहन विभाग मार्फत १५ जानेवारी २०२३ पर्यंत मुदत वाढवण्यात आली असून, या काळात सर्व रिक्षा चालकांनी मीटर रिकॅलीब्रेशन करुन घ्यावेत, असे आवाहन वाशी आरटीओ मार्फत करण्यात आले आहे.

सध्या पेट्रोल दर १०६ रुपयांवर स्थिरावले असेल तरी सीएनजी दरात  सातत्याने वाढ होत आहे. नवी मुंबई शहरात जवळपास ९५ ते ९८ टक्के रिक्षा या सीएनजीवर चालतात. त्यामुळे पुन्हा रिक्षा भाडेवाढ  करण्याची मागणी होईल अशी आशा रिक्षाचालकांना आहे. सध्या असलेले भाडे २३ रुपये ऐवजी २५ रुपये होतील अशी अपेक्षा रिक्षा चालकांना आहे. या अपेक्षेने रिक्षाचालकांनी पुन्हा दरवाढ झाल्यानंतरच मीटर रिकॅलीब्रेशन करून घेता येईल, या अनुषंगाने मीटर रिकॅलीब्रेशन केले नसल्याचा अंदाज आरटीओ विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. बहुतांश रिक्षाचालकांनी मीटर रिकॅलीब्रेशन केले नसल्याने आता आणखी ४५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, १५ जानेवारी २०२३ पर्यंत मीटर रिकॅलीब्रेशन करता येणार आहे.

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रामध्ये प्रवाशांना सेवा देणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी यांची  १ ऑक्टोंबर २०२२ पासून भाडेदर सुधारणा लागू झाली आहे. त्याअनुषंगाने ऑटोरिक्षा परवाना धारकांनी भाडेमीटरचे रिकॅलीब्रेशन ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत करुन घेण्याबाबत कळविण्यात आले होते. परंतु, आता त्यास ४५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, १५ जानेवारी २०२३ पर्यंत रिक्षा आणि टॅक्सी यांचे भाडेमीटर रिकॅलीब्रेशन करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

नवी मुंबई शहरात ३७ हजार रिक्षा असून, त्यातील  १२ हजार रिक्षाचालकांनी भाडेमीटर रिकॅलीब्रेशन केल्याची नोंद आहे. परंतु, परिवहन कार्यालयाने मुक्त धोरण अवलंबल्याने इतर उपनगरातही रिक्षाचालक मीटर रिकॅलीब्रेशन करु शकतात. त्यामुळे त्या ठिकाणीही नवी मुंबईतील रिक्षा चालकांचे मीटर रिकॅलीब्रेशन झाली असण्याची शक्यता आहे. वाढत्या सीएनजी दराने आणखी भाडेवाढ होईल या अपेक्षेने काही रिक्षाचालकांनी मीटर रिकॅलीब्रेशन केले नसल्याचा अंदाज आहे. - हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) - वाशी.
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवीन वर्षात दिघा रेल्वे स्थानक होणार सुरु