'हर घर झेंडा' मोहीम प्रमाणे संविधान दिन निमित्ताने शासनाने हर घर संविधान ही मोहीम राबवावी - प्राचार्य आर.बी.जाधव

..तरच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्या मधील भारतीय नागरिक घडेल...प्राचार्य आर.बी.जाधव यांचे मत  

नवी मुंबई : ज्याप्रमाणे स्वातंत्र्यदिनी 'हर घर झेंडा' मोहीम राबवली गेली. त्याप्रमाणे संविधान दिन निमित्ताने शासनाने हर घर संविधान ही मोहीम राबवावी. तसेच आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये नागरिकशास्त्र हा विषय फक्त पंधरा गुणांचा  न ठेवता ५० गुणांसाठी  तो विद्यार्थ्यांना अभ्यासाला ठेवावा. जेणेकरून संविधान तसेच संविधानाने दिलेले आपले हक्क, जबाबदाऱ्या, कर्तव्य या सर्व गोष्टींची मुलांना ओळख होईल . तरच खऱ्या अर्थाने भारतीय नागरिक घडेल असे मत प्राचार्य आर. बी .जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.

सविधान दिनाचे औचित्य साधून शेतकरी शिक्षण संस्थेच्या विद्यालयाच्या प्रांगणात संविधान दिन समारोह उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आर.बी.जाधव अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी वक्ते ॲड.अरुण सुरवडे, मदन शिरसाठ, विश्वनाथ जाधव हे सर्व बँकिंग क्षेत्रातील  निवृत्त अधिकारी व शाळेचे उप प्राचार्य उमेश कोलते व पर्यवेक्षक प्रमोद शेरेकर उपस्थित होते.

प्रमुख वक्ते ॲड. अरुण  सुरवडे यांनी आपल्या भाषणामध्ये संविधान निर्मितीची प्रक्रिया, संविधानाचे महत्त्व,संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका, आपणास मिळालेले मूलभूत अधिकार तसेच संविधान दिन या दिवशी सार्वजनिक सुट्टी देऊन त्याविषयी जनजागृती करणे या मुद्द्यांवर भर दिला. दुसरे वक्ते  मदन शिरसाट यांनी संविधान निर्मिती तसेच संविधानातील ठळक कलम, परिशिष्ट, घटनादुरुस्ती याच्या विषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधत या सोप्या भाषेत संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. विद्यार्थ्यांशी चर्चा करताना काही प्रश्न विचारून तसेच घोषवाक्य या माध्यमातून त्यांनी आपले विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावीचे सुमारे १६०० विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटना, संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करून करण्यात आली. रघुनाथ खोडके यांच्यासह सर्व विद्यार्थी व उपस्थितांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन केले.

नवी मुंबई महानगरपालिका माध्यमातून आयोजित संविधान दिन कार्यक्रमांमध्ये भाषण स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल  विद्यालयातील इयत्ता दहावीतील विद्यार्थी ओंकार राठोड याचे कौतुक करून सन्मानित करण्यात आले. नंतर आभार प्रदर्शन व राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रमुख वक्त्यांचा परिचय मनोहर पाटील व रवींद्र कोळी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका अश्विनी पाटील  व आभार प्रदर्शन  कविता मढवी यांनी केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका आस्थापनेवरील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी