६ स्थानकांचे काम पूर्ण होताच प्रवासी वाहतुकीला ग्रीन सिग्नल

नवी मुंबई ः सिडको महामंडळ आणि इंडस्ट्रीअल क्रेडीट ॲन्ड इन्व्हेस्टमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (आयसीआयसीआय) बँक यांच्यात २५ नोव्हेंबर २०२२ रोजी करार करण्यात येऊन या करारानुसार आयसीआयसीआय बँकेकडून सिडको नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र.१ करिता ५०० कोटी रुपयांचा पतपुरवठा करण्यात येणार आहे. आयसीआयसीआय बँकेकडून मंजूर करण्यात आलेल्या पतपुरवठ्यामुळे मेट्रो मार्ग क्र.१ प्रकल्पासाठी फायनान्शियल क्लोजर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान, याद्वारे ‘सिडको'चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकम डॉ. संजय मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली मेट्रो प्रकल्पातील एक मोठा टप्पा गाठला गेला आहे.

नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र.१ वर ३ डब्यांची मेट्रो धावणार आहे. मार्ग क्र.१ बेलापूर ते पेंधर असा ११.१ कि.मी. लांबीचा आणि ११ स्थानके असणारा मार्ग आहे. या मार्गावरील व्हायडक्टचे काम पूर्ण झाले असून ११ पैकी ५ स्थानके प्रवासी वाहतुकीकरिता सुसज्ज झाली आहेत. या मार्गाकरिता सीएमआरएससह सर्व महत्त्वाच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित ६ स्थानकांचे काम वेगाने सुरु झाले असून संपूर्ण मार्गावर लवकरच प्रवासी वाहतूक सुरु होणे अपेक्षित आहे.

मेट्रो मार्ग क्र.१ करिता ३,४०० कोटी रुपये इतका खर्च अंदाजित असून त्यापैकी २,६०० कोटींचा खर्च ‘सिडको'कडून यापूर्वीच करण्यात आला आहे. उर्वरित खर्च आयसीआयसीआय बँकेकडून करण्यात येणाऱ्या ५००कोटींच्या पतपुरवठ्याद्वारे आणि ‘सिडको'च्या अंतर्गत संचित निधितून करण्यात येणार आहे. नवी मुंबई अंतर्गत कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या दृष्टीने ‘मेट्रो'चे प्रकल्प महत्त्वाचा असून येथील नागरिकांना प्रवासाचा उत्तम पर्याय देण्यासह बांधकाम क्षेत्राला चालना देण्याकरिता सदर प्रकल्प मोलाची भूमिका बजावणार आहे.

आयसीआयसीआय बँकेकडून करण्यात येणाऱ्या ५०० कोटी रुपयांच्या पतपुरवठ्यामुळे मेट्रो मार्ग क्र.१ वरील कामांना गती मिळणार आहे. नियोजित वेळेत मेट्रो मार्ग क्र.१ वरील कामे पूर्ण होऊन लवकरात लवकर या मार्गावर प्रवासी वाहतूक करता येणे शक्य होणार आहे. आयसीआयसीआय बँकेकडून मंजूर करण्यात आलेल्या पतपुरवठ्यामुळे एकप्रकारे ‘सिडको'च्या प्रकल्पांच्या विश्वासार्हतेवर मोहोर उमटविण्यात आली आहे.
-डॉ.संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

'हर घर झेंडा' मोहीम प्रमाणे संविधान दिन निमित्ताने शासनाने हर घर संविधान ही मोहीम राबवावी - प्राचार्य आर.बी.जाधव