प्रदूषण विरोधात खारघरमध्ये निषेध रॅली

खारघर शहरातील पाणी, हवा प्रदुषित  

खारघर ः तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषणयुक्त सांडपाणी खाडी मार्गे खारघर मध्ये येत असल्याने येथील नागरिकांना या प्रदूषणयुक्त सांडपाण्याचा प्रचंड त्रास होत आहे. या विषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पत्र व्यवहार करुनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक नरेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली २७ नोव्हेंबर रोजी खारघर मध्ये  निषेध रॅली काढण्यात  आली होती.


रॅलीत माजी पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, खारघर शहर सरचिटणीस कीर्ती नवघरे, अमर उपाध्याय, माजी नगरसेविका आरती नवघरे, भाजप पदाधिकारी दिलीप जाधव, गीता चौधरी, बीना गोगरी, गुरुनाथ गायकर यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
तळोजा औद्योगिक क्षेत्रातून रात्री सोडल्या जाणाऱ्या प्रदूषित वायूमुळे खारघर मधील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच तळोजा औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्या नदी, नाल्यात सोडत असलेले प्रदूषणयुक्त सांडपाणी खारघर सेक्टर -१० लगत असलेल्या खाडीमध्ये येत असल्यामुळे जल तसेच खारफुटीला धोका निर्माण झाला आहे. जल आणि वायू प्रदूषणामुळे खारघर सेक्टर-१० मधील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांनी या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केल्यास आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा यावेळी नरेश ठाकूर यांनी दिला.


निषेध रॅली खारघर सेक्टर-१० मधील बँक ऑफ इंडिया चौक ते सेक्टर-२ मधील लिटिल वर्ल्ड मॉल परिसरात काढण्यात आली.  रॅली यशस्वी करण्यासाठी ‘प्रदूषण विरोधी समिती'चे पदाधिकारी नितीन पालकर, सुरेश ठाकूर, मीरा घुगे, ॲड. नेहा यादव, सुषमा शुक्ला, प्रज्ञा जैन, श्रृती नेमा, गुरुनाथ तोडकर, पूजा काटेकर, सत्यपाल चुग, अरविंद जैन, जे. एन. झा, सोनावणे, मोहनसिंग बिस्ट, विलास सावंत, जयकुमार पांडे, संजय सायगावकर, तुकाराम घोडके, नीलकमल शर्मा, अर्पणा मट्टा, दिलीप पांचाळ, नामदेव इंगळे, कैलास राव, राजीव दुबे, देवेंद्र यादव, मनोज नेमा, नितीन पागेराट यांनी मेहनत घेतली.


तळोजा एमआयडीसी मधील कंपन्यांमधून खारघर लगत असणाऱ्या खाडीमध्ये घातक आणि विषारी रसायने सोडली जात आहेत. त्यामुळे पाण्याबरोबरच खारघर शहरातील हवा देखील प्रदुषित झाली आहे. मात्र, यावर तळोजा एमआयडीसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी उपाययोजना करताना दिसत नाहीत. खारघर लगत असणाऱ्या खाडीमध्ये सोडण्यात येत असलेल्या घातक आणि विषारी रसायनांची प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यास केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे तक्रार केली जाणार आहे. -  परेश ठाकूर, माजी सभागृह नेते - पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जेएनपीए मध्ये बंदर अधिकाऱ्यांसाठी ‘ओरिएंटेशन प्रोग्राम’