जेएनपीए मध्ये बंदर अधिकाऱ्यांसाठी ‘ओरिएंटेशन प्रोग्राम’ 

उरण  : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण अर्थात जेएनपीए हे  भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे  बंदर असून जेएनपीए ने आपल्या प्रशिक्षण केंद्रात देशातील 'प्रमुख बंदरांतील अधिकाऱ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम' आयोजित केला आहे. हा कार्यक्रम 28 नोव्हेंबर 2022 पासून 9 डिसेंबर 2022 पर्य॔त चालेल. डी जी शिपिंगच्या माजी संचालक व भारतीय सागरी विद्यापीठाच्या कुलपति डॉ. मालिनी शंकर यांनी या ओरिएंटेशन प्रोग्रामचे उद्घाटन केले. यावेळी जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी, भा.प्र.से., उपाध्यक्ष  उन्मेष शरद वाघ, भा.रा.से., एमपीएसईजेडचे माजी संचालक व जेएनपीएचे सल्लागार राजीव सिन्हा, विविध क्षेत्रातील तज्ञ प्राध्यापक सदस्य आणि भारतातील प्रमुख बंदरांमधील सहभागी अधिकारी उपस्थित होते.

जेएनपीए द्वारे देशातील प्रमुख बंदरांतील अधिकार्‍यांसाठी आयोजित केलेला हा अशा प्रकारचा पहिलाच ओरिएंटेशन प्रोग्राम आहे. यासाठी बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाने सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांना बंदर अधिकार्‍यांसोबत आपले ज्ञान व कौशल्य सामायिक  करण्यासाठी आमंत्रित केले आहे. आपल्या देशातील बंदर क्षेत्रातील कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्यामध्ये प्रासंगिक व नवीन कार्यपद्धती आणण्यासाठी भारतातील सर्व प्रमुख बंदरांमधून अधिकारी या ओरिएंटेशन प्रोग्रामध्ये सहभागी झाले आहेत.

यावेळी बोलताना डी जी शिपिंगच्या माजी संचालक व भारतीय सागरी विद्यापीठाच्या कुलपति डॉ.मालिनी शंकर म्हणाल्या, “जेएनपीएने हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे कारण या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील विविध  क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांच्या सोबत होणारी चर्चा व मार्गदर्शना द्वारे बंदर अधिकार्‍यांना एक वेगळा दृष्टीकोन प्राप्त होईल ज्यामुळे बंदर अधिकार्‍यांचे कौशल्य वाढवण्यास आणि त्यांना प्रासंगिक व नवीन कौशल्य प्राप्त करण्यास मदत होईल. महसूल मॉडेल, मालकी मॉडेल, बंदर क्षेत्रातील पीपीपी, लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी इत्यादी विविध विषयांवर होणारी चर्चा व मार्गदर्शनातून सागरी उद्योगाच्या मागण्या आणि अपेक्षा पूर्ण होण्यास मदत होईल. 

यावेळी बोलताना जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले, “सध्याच्या वेगवान कामाच्या वातावरणात समग्र  ज्ञान व कौशल्य प्राप्त करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन हा प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. दोन आठवडे चालणा-या या प्रशिक्षण कार्यक्रमा मध्ये देशातील विविध क्षेत्रातील अग्रगण्य तज्ञ व अनुभवी  प्राध्यापक विविध विषयावर मार्गदर्शन व  बंदराच्या कामकाजाचे समग्र विहंगावलोकन करतील. या ओरिएंटेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून बंदर क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अद्ययावत ज्ञान प्राप्त करत राहण्याची आणि माहीती सामायिक करण्याची गरज पूर्ण होते.”

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या आठवड्यासाठी विषय आहे “पोर्ट ऑपरेशन्स आणि इकोसिस्टम.’ सरकारी व खाजगी क्षेत्रातील आणि पोर्ट ऑफ अँटवर्प इंटरनॅशनल मधील तीन दशकांहून अधिक काळ अनुभव आणि कौशल्य असलेले तज्ञ प्राध्यापक प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करतील. 

दुसऱ्या आठवड्यासाठी, ‘व्यवस्थापकीय परिणामकारकता’ हा विषय आहे, ज्यामध्ये आयआयएम इंदूरचे अनुभवी प्राध्यापक सहभागींना मार्गदर्शन करतील. प्रशिक्षण सत्रां दरम्यान,एसईजेड, एमएमएलपी इत्यादी विषयांवर पॅनेल चर्चा आणि प्रत्यक्ष प्रकल्प स्थळाच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दोन आठवडे चालणा-या या ओरिएंटेशन कार्यक्रमा दरम्यान सहभागींना वित्त, ऑपरेशन्स, डिजिटायझेशन, ड्रेजिंग, बंदरातील खाजगी क्षेत्राचा सहभाग, रणनीती आणि त्याच्या व्यवसाय युनिट संदर्भात मार्गदर्शना सोबतच बंदराच्या समग्र कामकाजाचे विहंगावलोकन केले जाईल. पीपीपी प्रकल्पांची ओळख, सवलतीच्या कराराची संकल्पना, चांगल्या प्रकल्प कराराची वैशिष्ट्ये आणि नियामक मंजुरींसह देखरेख जसे की पर्यावरण मंजुरी आणि प्रक्रिया, मॉडेल पोर्ट डेव्हलपमेंटचे सर्वसमावेशक मूल्यांकन, इत्यादीसह इतर विविध विषयांवर प्राध्यापकांद्वारा मार्गदर्शन  केले जाईल.

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आयडियल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2022 मध्ये उरणच्या सुपुत्राचा सन्मान