सिडकोचे ३०० कोटींचे नुकसान वाचले 

तारांकित हॉटेलची वादग्रस्त निविदा अखेर रद्द 

व्यवस्थापकीय संचालकांच्या निर्णयाचे स्वागत 

नवी मुंबई :  नवी मुंबईत तारांकित हॉटेल उभारणीसाठी बेलापूर येथील विक्रीस काढलेल्या भूखंडाला अपेक्षित दर प्राप्त न झाल्यामुळे अखेर सिडको व्यवस्थापनाने सदर भूखंडाची निविदा प्रक्रिया रद्द करून सर्व निविदाधारकांच्या अनामत रकमा परत करून टाकल्या आहेत. सिडको व्यवस्थापनाने घेतलेल्या या निर्णयामुळे सिडको महामंडळाचे या भूखंड विक्रीतून होणारे तीनशे कोटीचे नुकसान टळले आहे. 

बेलापूर सेक्टर-२३ येथे तारांकित हॉटेल उभारणीकरिता सिडकोने ई-निविदा व ई-लिलाव पद्धतीने भूखंड विक्रीस काढला होता. परंतु सदर भूखंडास प्राप्त झालेला दर आणि प्रतिसाद अल्प होता. सदर भूखंडाच्या लगत निवासी व वाणिज्य वापरासाठी सिडकोने विक्री केलेल्या अन्य भूखंडांना सव्वातीन ते साडेतीन लाख रुपये प्रति चौरस मीटरचा दर प्राप्त झाला होता. याशिवाय चार दिवसापूर्वी सानपाडा येथील विक्री केलेल्या भूखंडास  ५ लाख ५४ हजार रुपये प्रति चौरस मीटर  दर सिडकोस प्राप्त झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईत सिडकोच्या भूखंडांना चांगलीच मागणी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अशा परिस्थितीत बेलापूर इथल्या अपोलो हॉस्पिटल लगत तारांकित हॉटेल उभारण्याकरता सिडकोने काढलेल्या निविदेला प्राप्त झालेला सर्वाधिक दर हा प्रति चौरस मीटर ८९ हजार रुपये इतका कमी प्राप्त झाला होता. त्यात सिडको संचालक मंडळाने भूखंड वापर बदल करण्याच्या मंजूर केलेल्या ठरावामुळे निविदा धारकास सिडकोला अल्प प्रीमियम भरून निविदाधारक तारांकित हॉटेलच्या भूखंडाचा वापर बदल करून त्या ठिकाणी निवासी व वाणिज्य संकुल उभारण्याची शक्यता नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात होती. तसेच तारांकित हॉटेल भूखंडाच्या वापर बदलास सिडकोने परवानगी दिल्यास मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊन सिडकोचे सुमारे ३०० कोटीहून अधिक आर्थिक नुकसान होण्याची भीती नवी मुंबईतील विकासकांनी व्यक्त केली होती. 

विशेष म्हणजे तारांकित हॉटेल या विशिष्ट प्रयोजनासाठी भूखंड विक्रीस काढताना सिडकोने सीव्हीसी गाईडलाईनुसार अनुभवाचा तांत्रिक लिफाफा (टेक्निकल बीड) न मागविल्याने सदर निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या भूखंड विक्रीसाठी सिडकोने टेक्निकल बीडच न मागविल्याने ही निविदाच नियमबाह्य ठरत असल्याचे आरोप विकासक करु लागले होते. त्यामुळेच नवी मुंबईत तारांकित हॉटेल करिता सिडकोने काढलेला भूखंड हा त्याच प्रयोजनासाठी राखून ठेवावा अशी मागणी जोर धरत होती. सदर निविदा प्रक्रिया रद्द करून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी महामंडळाच्या हिताचा निर्णय घेत सिडको महामंडळाचे शेकडो कोटींचे नुकसान वाचवल्याची प्रतिक्रिया बांधकाम व्यावसायिकांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका उपायुवत पटनिगीरे अडचणीत?