बेलापूर न्यायालयात जिल्हा सत्र न्यायालय व कौटुंबिक न्यायालय सुरू होणार

नवी मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर येथील न्यायालयात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या दोन न्यायालया प्रमाणेच कौटुंबिक न्यायालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हे तीन न्यायालय सुरु करण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाला राज्याच्या विधि व न्याय विभागाने शासन निर्णयाद्वारे नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता अशीलांची व वकीलांची ठाणे न्यायालयाची पायपिट वाचणार असून त्यांच्या वेळेची व पैशांची देखील बचत होणार आहे. येत्या २६ जानेवारी पासून येथून न्यायदानाच्या कारभाराला सुरुवात होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नवी मुंबई शहराचा एकीकडे झपाट्याने विकास होत असतानाच, विविध प्रकारच्या गुन्ह्यात देखील वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे न्यायालयातील खटल्यांची संख्या देखील वाढु लागली आहे. सध्या बेलापूर येथील न्यायालयात १६ कोर्टरुम असून या सर्व न्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरुपाचे कमी शिक्षा असलेले खटले चालवले जात आहेत. तर हत्या, बलात्कार, पोक्सो, तसेच इतर गंभीर गुन्ह्यांचे फौजदारी स्वरुपाचे खटले, त्याचप्रमाणे ५ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कमें दिवाणी स्वरुपयाचे खटले ठाण्यातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात चालविली जात आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील अशिलांना व त्यांच्या वकीलांना या खटल्यांच्या कामकाजासाठी न्यायालयात हजर राहण्यासाठी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात नियमित हेलपाटे मारावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय होत होता..

त्यामुळे बेलापूर येथील न्यायालयात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर त्याचप्रमाणे कौटुंबिक न्यायालय सुरु करण्याची मागणी नवी मुंबईतील वकील संघटनेकडुन करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन तसेच नवी मुंबईतील खटल्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन बेलापूर येथील न्यायालयात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय, विरिष्ठ स्तर त्याचप्रमाणे कौटुंबिक न्यायालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. नुकतेच राज्याच्या विधी व न्याय विभागाने या न्यायालयांसाठी आवश्यक असलेल्या मनुषबळाला शासन निर्णयाद्वारे मंजुरी दिली आहे. येत्या २६ जानेवारी पासून या न्यायालयांच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

बेलापूर येथील न्यायलयात सुरु होणाऱ्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी न्यायाधीशांचे एक पद, अधिक्षक- १. लघुलेखक- १. वरिष्ठ लिपीक-४. कनिष्ठ लिपीक- ९ व बेलिफ-३ अशा एकुण १९ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. तर बाह्ययंत्रणेद्वारे ५ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालयासाठी दिवणी न्यायाधीशांचे एक पद, अधिक्षक-१, सहाय्यक अधीक्षक- २. लघुलेखक- १. वरिष्ठ लिपीक- २. कनिष्ठ लिपीक- ६ तर बेलिफ-३ अशा एकुण १६ पदांना मजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही न्यायालयामध्ये ठाणे न्यायालयातील प्रलंबित व सुरु असलेले सर्व खटले वर्ग करण्यात येणार आहेत. ठाणे सत्र न्यायालयात नवी मुंबईतील अनेक खटले प्रलंबित आहेत. त्यात आत नवीन खटल्यांची भर पडणार असल्याने बेलापूर न्यायालयात सुरु होणाऱ्या दोन्ही नव्या न्यायालयावर त्याचा ताण पडणार असल्याचे बाेलले जात आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रत्येकाने संविधान साक्षर होणे आवश्यक आहे- माजी न्यायाधिश बी. एल. वाघमारे